कर्जासाठी तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
अंधेरीतील ज्वेलर्स व्यापारी पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी तारण ठेवलेल्या सुमारे नऊ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा ज्वेलर्स व्यापारी पिता-पूत्राने अपहार करुन फसवणुक केल्याची घटना अंधेरीतील डी. एन नगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुमीत गेलोत आणि भवरलाल गेलोत या पिता-पूत्राविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
इस्माईल ख्वाजा मंसुरी यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून ते अंधेरीतील सात बंगला परिसरात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून ते सुमेर व त्यांचे वडिल भवरलाल यांना ओळखतात. या पिता-पूत्रांचा अंधेरीतील डी. एन नगर मधुरिमा सहकारी सोसायटीमध्ये कापूर्णम गोल्ड नावाचे एक शॉप आहे. अनेकदा त्यांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेतले होते. मे 2018 रोजी इस्माईलचे मित्र व नातेवाईक आसिफ मंसुरी यांना वैयक्तिक कारणासाठी दोन लाखांची गरज होती. याबाबत त्यांनी सुमीतशी चर्चा केली होती. यावेळी सुमीतने काही दागिने तारण ठेवून त्यांना दिड टक्क्यावर दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे नऊ लाखांचे सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते.
काही महिन्यानंतर त्यांनी त्यांना दोन लाखांची मुद्दल आणि तीस हजार व्याज असे दोन लाख तीस हजार रुपये दिले. यावेळी त्यांनी सुमीत आणि भवरलाल यांच्याकडे त्यांच्या गहाण दागिन्यांची मागणी केली होती. त्यांनी ते दागिने अंधेरीतील सागर शॉपिंग सेंटरचे नरेशभाई यांच्याकडे दिले असून ते बाहेरगावी गेले आहेत. मुंबईत येताच त्यांना त्यांचे दागिने परत केले जाईल असे सांगितले. काही दिवसांनी त्यांनी त्यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली, मात्र या दोघांनी त्यांना प्रतिसाद दिा नाही. वेगवेगळे कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे इस्माईल मंसुरी त्यांच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांना दुकान बंद असल्याचे दिसून आले.
दोन लाखांच्या कर्जासाठी गहाण ठेवलेल्या सुमारे नऊ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा गेलोत पिता-पूत्रांनी अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुमीत आणि भवरलाल गेलोत या पिता-पूत्राविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.