कंपनीत आर्थिक घोटाळा करणार्या मॅनेजर महिलेस अटक
पैशांतून मित्रांसोबत मौजमजा करुन बँकेत पैसे ट्रान्स्फर केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – आपल्या पदासह क्रेडिट सुविधांचा गैरवापर करुन कंपनीत आर्थिक घोटाळा करणार्या प्रतिक्षा पुरुषोत्तम वर्तक नावाच्या एका निलंबित मॅनेजर महिलेस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवार 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याकामी प्रतिक्षाला मदत करणारा तिकिट बुकिंग कर्मचारी ओमकार चंद्रकांत प्रभाळे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी कंपनीच्या पैशांतून पाच मित्रांसोबत देश-विदेशात मौजमजा करुन कंपनीच्या बँक खात्यातून 20 लाख 57 हजार रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.
प्रणव अनिल पवार हा मिरा-भाईंदर परिसरात परिसरात राहत असून सेल्टन स्मार्ट सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कायदेशीर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ही कंपनीत कारो ट्रिप नावाच्या ट्रॅव्हेल्स एजन्सीच्या मदतीने विविध विमान, बस तिकिट, हॉटेल बुकिंग, हॉलिडे प्लॅन, बिझेनस टूर तसेच सुट्टीचे आयोजन करते. त्यासाठी त्यांच्या कंपनीला कारो ट्रिपने पाच लाखांपर्यंत क्रेडिटची सुविधा दिली असून बुकींगमधून कंपनीला ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिले जाते. मालाड येथे कारो ट्रिपचे मुख्य कार्यालय असून तिथे प्रतिक्षा ही ब्रॅच मॅनेजर तर ओमकार हा तिकिट बुकींग अधिकारी म्हणून काम पाहत होते.
कंपनीत होणार्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदार प्रतिक्षावर होती. प्रतिक्षा कामात हुशार असल्याने तिच्यावर कंपनीच्या मालकांचा प्रचंड विश्वास होता. ऑक्टोंबर 2023 रोजी प्रतिक्षाने कंपनीच्या संचालिका शोभना सिंग यांना मोठी बुकींग मिळणार असल्याचे सांगितले होते. यावेळी तिने कंपनीच्या बँक खात्यातून तिच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. या व्यवहाराची माहिती नंतर शोभना सिंग यांना मिळाली होती. त्यामुळे तिने प्रतिक्षाकडे विचारणा केली, मात्र तिच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे तिने कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत प्रतिक्षाने ओमकार प्रभाळे याच्यासोबत कंपनीत लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते.
2 फेब्रुवारी ते 11 मे 2024 या कालावधीत प्रतिक्षा आणि ओमकार यांनी स्वतसह त्यांच्या पाच मित्रांच्या मौजमजेसाठी कंपनीच्या क्रेडिट सेवेचा गैरवापर करुन 6 लाख 53 हजार 417 रुपये खर्च केले होते. इतकेच नव्हे तर आपल्या पदाचा गैरवापर करुन कंपनीच्या मालकांसह संचालकांची कुठलीही परवानगी घेता 13 लाख 31 हजार 685 आणि 72 हजार 500 रुपये नेट बँकिंगद्वारे स्वतच्या खात्यात ट्रान्स्फर केले होते. अशा प्रकारे या दोघांनी कंपनीत 20 लाख 57 हजार 602 रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले होते. या प्रकारानंतर प्रतिक्षा वर्तक आणि ओमकार प्रभाळे यांना कंपनीतून निलंबित करण्यात आले होते. त्याची कंपनीच्या मालकासह संचालकांनी गंभीर दखल घेत प्रणव पवार यांना पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर कंपनीच्या वतीने प्रणव पवार यांनी बांगुरनगर पोलिसांत दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रतिक्षा वर्तक आणि ओमकार प्रभाळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या प्रतिक्षाला दिड वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ओमकार प्रभाळे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.