23 लाखांच्या दोनशे ग्रॅम सोन्याच्या बिस्कीटाची चोरी
दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या कर्मचार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 डिसेंबर 2025
मुंबई, – सुमारे 23 लाख रुपयांच्या दोनशे ग्रॅम वजनाच्या बिस्कीटाची चोरी करुन पळून गेलेल्या एका नोकराला दोन महिन्यानंतर दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. गजेंद्र जोग सिंह ऊर्फ गजेंद्रसिंग राजपूत असे या नोकराचे नाव असून चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन्ही सोन्याचे बिस्कीट हस्तगत केले जाणार आहे.
व्यवसायाने ज्वेलर्स व्यापारी असलेले जितेंद्र मांगीलाल जांगीड हे बोरिवलीतील एमएचबी कॉलनीत राहतात. त्यांचे सासरे शेषाराम चुन्नीलाल शर्मा यांचा दहिसर येथे नवनीत चैन नावाने दहिसर येथील तन्वी कॉम्प्लेक्समध्ये सोन्याचे दागिने बनविण्यचा एक कारखाना आहे. याच कारखान्यात जितेंद्र जांगीड यांच्यासह त्यांचा मेहुणा अर्जुन शेषाराम शर्मा हे दोघेही मॅनेजर म्हणून काम करतात. कारखान्यात एकूण सतराहून अधिक कामगार असून प्रत्येकाकडे वेगवेगळ्या सोन्याचे दागिने बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कारखान्यात झव्हेरी बाजार येथील विविध ज्वेलर्स व्यापार्याकडून सोने घेऊन त्यांना सोन्याचे दागिने बनविण्याचे काम चालते.
ऑक्टोंबर 2025 रोजी शेषाराम यांची प्रकृती ठिक नसल्याने ती त्यांच्या गावी गेले होते. त्यामुळे कारखान्यांची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. कच्चे सोने आणणे, दागिने बनवून ते दागिने व्यापार्यांना पाठविणे याची जबाबदारी गजेंद्रसिंग आणि पुराराम देवाशी यांच्यावर होती. 30 सप्टेंबरला ते दोघेही दागिन्यांच्या डिलीव्हरीसाठी झव्हेरी बाजार येथे गेले होते. ज्वेलर्स व्यापार्यांना दागिने देताना ते वेगळे झाले होते. यावेळी गजेंद्रसिंगला दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी 23 लाख 11 हजार रुपयांचे दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट दागिने बनविण्यासाठी दिले होते. ते बिस्कीट घेऊन त्याला रात्री उशिरापर्यंत कारखान्यात येणे अपेक्षितहोते.
मात्र रात्री उशिरापर्यंत तो कारखान्यात आला नाही. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे जितेंद्र जांगीड यांनी पुरारामकडे गजेंद्रसिंगविषयी विचारपूस केली. मात्र त्याला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी संबंधित ज्वेलर्स व्यापार्यांना कॉल केला होता, यावेळी काही व्यापार्यांनी त्यांच्याकडे गजेंद्रसिंग आल्याचे सांगितले तर दोघांनी त्याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दोनशे ग्रॅम वजनाचे 23 लाख 11 हजार रुपयांचे सोन्याचे बिस्कीट दिल्याचे सांगितले. ते बिस्कीट कारखान्यात न आणता गजेंद्रसिंग हा पळून गेला होता.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी गजेंद्रसिंगविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन तीन दिवसांपूर्वी गजेंद्रसिंगला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच दोनशे ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या बिस्कीटाची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून लवकरच चोरीचे दोन्ही सोन्याचे बिस्कीट हस्तगत केले जाणार आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.