मोबाईल चोरी करुन पैसे ट्रान्स्फर करणार्या टोळीचा पर्दाफाश
नाशिक येथून चारजणांच्या टोळीस चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
मुंबई, – मोबाईल चोरी करुन पैसे ट्रान्स्फर करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा लोकमान्य टिळक रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत चारजणांना नाशिक येथून पोलिसांनी अटक केली. शुभम तात्या मोढळे, खुदबुद्दीन बशीर शेख, नूरमोहम्मद बाबू मदारी आणि अल्ताफ नूरमोहम्मद मदारी अशी या चौघांची नावे आहेत. आरोपींकडून पोलिसांनी तीन मोबाईलसह 70 हजार रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार 24 वर्षांचा तरुण कोलकाताच्या मालडाचा रहिवाशी आहे. 19 ऑगस्ट 2025 रोजी तो कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकातून कोलकाता येथे जाण्यासाठी आला होता. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. त्याच्या मोबाईलवरुन त्याच्या बँक खात्यातून 40 हजार 700 रुपये ट्रान्स्फर करुन फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर लक्षात येताच त्याने लोकमान्य टर्मिनस रेल्वे पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चोरीसह फसवणुक तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जब्बार तांबोळी यांचया मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गावीत, पोलीस उपनिनरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार राहुल अहिरे, विलास पाटील, नारायण बिडकर, पोलीस शिपाई श्रीधर मैदाड, सौरभ चौधरी, अमीत वाघमोडे, सागर मोरे, सूर्यवंशी, तोडकर यांनी तपास सुरु केला होता.
या पथकाने रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शुभम मोढळे, खुदबुद्दीन शेख, नूरमोहम्मद मदारी आणि अल्ताफ मदारी या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडून पोलिसांनी तीन चोरीचे मोबाईलसह सत्तर हजाराची कॅश असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चौकशीत अटक आरोपींची मदारी नावाची एक टोळी असून ही टोळी कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊन तो मोबाईल घेऊन पळून जात होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जीपे, फोन पे यासारख्या अॅपमार्फत दुसर्या अकाऊंटवर पैसे ट्रान्स्फर करुन फसवणुक करते. चोरीनंतर ही टोळी त्यांच्या नाशिक येथील येवला गावी पळून जात होती. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.