मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 डिसेंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील एका बोगस कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी नऊजणांना अटक केली आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. घटनास्थळाहून पोलिसांनी अकरा लॅपटॉप, अकरा हेडफोन, अठरा मोबाईल, एक स्विच, दोन राऊटर तसेच कॉल सेंटरशी संबंधित काही आक्षेपार्ह दस्तावेज असा पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांत काही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अंधेरी येथे एक बोगस कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणुक होत असल्याची माहिती युनिट आठच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक समीर लोणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, राहुल प्रभू, रोहन बगाडे, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, पोलीस हवालदार चव्हाण, किणी, काकडे, कांबळे, पाटील, सोनावणे, पोलीस शिपाई सटाले, डवंग, महिला पोलीस शिपाई गायकवाड यांनी अंधेरीतील जे. बी नगर, बगरका कॉलेजवळील अखंड आनंद सोसायटीचया पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक 103 तसेच पाचव्या मजल्यावर सुरु असलेल्या कॉल सेंटरवर कारवाई केली होती.
या कारवाईत पोलिसांना तिथे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून आपसांत संगनमत करुन विदेशी नागरिकांची फसवणुक होत असल्याचे दिसून आले. त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे वैयक्तिक डाटा चोरी, संगणकीय प्रणाली तयार करुन व्हिीओाअयपी आणि इतर ऑनलाईन कॉलिंग माध्यमांचा वापर केला जात होता. त्यांना अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून खोट्या नावाने संपर्क साधला जात होता. स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी संबंधित अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली जात होती. या कारवाईत तिथे उपस्थित नऊजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉपसह इतर मुद्देमाल जप्त केला.
या सर्व आरोपींविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता, आयटी, दूरसंचालक अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर नऊ आरोपींना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासात संंबंधित आरोपी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटचया नावाने तसेच डीआरआयचे (ड्रग्ज इन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन) अधिकारी असल्याची बतावणी करुन बोगस कॉल सेंटर चालवत असल्याचे उघडकीस आले आहे.