ड्रग्जसहीत जुगारासाठी चोरी करणारे सराईत गुन्हेगार गजाअड

चोरीच्या मुद्देमालासह मोबाईलसह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – ड्रग्जसहीत जुगारासाठी मोबाईल चोरी आणि घरफोडी करणार्‍या एका टोळीचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्याकडून पोलिसांनी घरफोडीसह चोरीचे मोठ्या प्रमाणात मोबाईल हस्तगत केले आहे. जेरबंद करण्यात आले आहे. मोहम्मद आसिफ अब्दुल लतिफ नुराणी आणि फिरोज मुख्यार शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अंधेरीतील जुहू गल्लीतील रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेने मोबाईल चोरीसह घरफोडीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही आरोपी ड्रग्जच्या आहारी गेले असून त्यांना जुगाराचे व्यसन होते, त्यासाठी ते मोबाईल चोरी आणि घरफोडी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अक्रम मोहम्मद शेख हा रिक्षाचालक असून अंधेरीतील जुहू गल्लीतील फारुकिया मशिदीसमोरील मिलनसार इमारतीमध्ये राहतात. 29 नोव्हेंबर सायंकाळी चार ते 30 नोव्हेंबर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने कपाटातील लाकडी तिजोरीतील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने, कॅश आणि एक मोबाईल असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांनी पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्क पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंछर, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रोहन बंगाळे, रेवन्नाथ घुगे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, पोलीस शिपाई सुमीत पोळ, प्रसाद वरे, मंगेश रांजणे, महिला पोलीस शिपाई निता दुडे यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद आसिफ नुराणी आणि फिरोज शेख या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या पथकाने मोहम्मद आसिफच्या घरातून घरफोडीच्या गुन्ह्यांतील विविध सोन्याचे, चांदीचे दागिने, दोन मोबाईल तर फिरोज शेख याच्या घरातून चोरीचे एकवीस मोबाईल असा 3 लाख 37 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त केलेले मोबाईल त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानक, जुहू, विलेपार्ले येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपासात मोहम्मद आसिफ हा तक्रारदार अक्रम शेख यांच्याच इमारतीमध्ये शेजारील फ्लॅटमध्ये राहत असून त्यांच्या घरी कोणीही नसल्याची माहिती मिळताच त्याने फिरोजच्या मदतीने ही घरफोडी केली होती. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मारामारी, खंडणीसाठी धमकी देणे, मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले.

ते दोघेही अंधेरीतील जुहू गल्लीत परिसरात राहत असून त्यांना ड्रग्जचे व्यसनआहे तर जुगार खेळण्याचा छंद होता. त्यासाठी ते मोबाईल चोरीसह घरफोडी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page