व्यावसायिक वादातून 37 वर्षांच्या हॉटेल व्यावसायिकाची हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच जोडप्यासह पाचजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – व्यावसायिक वादातून दशरथ मालवी चव्हाण या 37 वर्षांच्या हॉटेल व्यावसायिकाची अकराजणांच्या टोळीने लाथ्याबुक्यांनी आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना गोराई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या पाचजणांना गोराई पोलिसांनी अटक केली असून त्यात एका वयोवृद्धासह त्याच्या पत्नीचा समावेश आहे. रोलन ऑल्वीन मिरांडा, त्याची पत्नी रोजवर्ड रोलन मिरांडा, पवन सावरामल शर्मा ऊर्फ कलेंटन फरेरा, जोबॉय कलेंटन फरेरा आणि रॉबीता जोबॉन फरेरा अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण मालाडच्या मनोरीगाव आणि बोविरलीतील गोराईतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता बोरिवलीतील गोराई गाव, संस्कार ग्लोबल पॅगोडा रोड, ग्लोबल पॅगोडा परिसरात घडली. संगीता दशरथ चव्हाण ही महिा भाईंदरच्या उत्तन, लोहाराची बावडी परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहते. तिचा स्वतचा एक हॉटेल असून तिच्यासोबत तिचे पती दशरथ चव्हाण हे दोघेही हॉटेल चालवितात. तिथे आरोपींचा खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. या स्टॉलवरुन दोन्ही गटात काही दिवसांपासून वाद सुरु होता. या वादानंतर त्यांनी एकमेकांच्या स्टॉलविरोधात महानगरपालिका आणि वन विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांचे स्टॉल मनपा आणि वनअधिकार्‍यांनी तोडून टाकले होते.

त्याचा आरोपींच्या मनात प्रचंड राग होता. स्टॉल तोडल्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला होता. त्यामुळे त्यांनी दशरथ चव्हाण यांच्या हॉटेलसमोर पुन्हा स्टॉलचे काम सुरु केले होते. त्यावरुन त्यांच्यात पुन्हा खटके उडाले होते. याच कारणावरुन शुक्रवारी रात्री त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी आरोपींनी दशरथ चव्हाण यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी आणि नंतर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दशरथ यांच्या छातीला, पोटाला, डोक्याला, डोळ्यांच्या खाली हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश निवतकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी संगीता चव्हाण यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी संबधित आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत पोलिसांनी पळून गेलेल्या पाच आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. चौकशीत त्यांनीच ही हत्या केल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page