बीपीसीएल कंपनीच्या पाईनलाईन टॅपिंग करुन पेट्रोल चोरी

सराईत टोळीचा पर्दाफाश करुन तेरा आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – बीपीसीएल कंपनीच्या पाईनलाईन टॅपिंग करुन पेट्रोल-डिझेलची चोरी करणार्‍या एका टोळी सराईत टोळीचा आरसीएफ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तेरा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल पाईपलाईनला टॅपिंग करुन पेट्रोलची चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांसाठी वापरण्यात आलेले गॅस टँकर, लोखंडी क्लॅम्पसह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. विनोद देवचंद पंडीत, रियाज अहमद अयुब मुलला, सलीम मोहम्मद अली शेख, गोपाल नारायण ब्राम्हणलाल, मोहम्मद इरफान मोहम्मद हुसैन पठाण ऊर्फ राजू, श्रीकांत साहेबराव लोंढे, विनायक शशिकांत मिराशी, अहमद खान जुम्मा खान पठाण, निशान जगतीत सिंह, मैनुद्दीन मोहम्मद शेख, मुस्तफा मंजुरअली खान, नशीर शौकतअली चौहाण, इम्तियाज आरिफ लोहार अशी या तेराजणांची नावे असून अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

हर्षल शिवजीराव भाजीपाले हे बीपीसीएलमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कंपनीची पेप्सी कंपनी गेटजवळील गडकरी रोडवरुन पेट्रोल-डिझेलची एक पाईपलाईन जात होते. जमिनीखालील अडीच मीटर बोलवकर असलेली अठरा इंच व्यासाची पाईपलाईन टॅपिंग करुन काहीजण पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या घटनेनंतर त्यांनी आरसीएफ पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरसीएफ पोलिसांना आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त कलीम शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली फंटागळे, पद्माकर पाटील, मांढरे, पोलीस हवालदार खैरे, पोलीस शिपाई इंगवले, अनिल पाटील यांनी तपास सुरु केला होता.

हा तपास सुरु असताना विनोद पंडितला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर रियाज मुल्ला आणि सलीम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपासात ते तिघेही पाईनलाईन टॅपिंग करुन मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची चोरी करत असल्याचे उघडकीस आले. अशा प्रकारे पेट्रोल-डिझेल चोरी करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीचे ते तिघेही मुख्य आरोपी होते. या आरोपींनी त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने ही चोरी केली होती. त्यामुळे या सहकार्‍यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना त्यांच्या इतर दहा सहकार्‍यांना पोलिसांनी मुंबईसह नवी मुंबई आणि मुंब्रा परिसरातून अटक केली. या आरोपीविरुद्ध मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात पेट्रोल-डिझेल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page