फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने गंडा घालणार्या दोन भामट्यांना अटक
फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खात्याची माहिती दिल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्याने एका बिल्डरची सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी दोन भामट्यांना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. समीर पासनकर आणि अखिल शेख अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खात्याची माहिती दिल्याचा आरोप असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सुभाष सोपानराव पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहे. सध्या ते कलानगर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. जून 2025 रोजी त्यांना आराध्या सिंग नावाच्या एका महिलेची फे्रंड रिक्वेस्ट आली होती. ही रिक्वेस्ट त्यांनी स्विकारली होती. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. चर्चेदरम्यान तिने तिचा शिपिंगचा व्यवसाय असून असल्याचे सांगून ती नवी मुंबईतील सीबीडी परिसरात राहते. तिथेच तिचे स्वतचे एक खाजगी कार्यालय आहे. दिल्लीतही तिचे घर आणि कार्यालय असल्याचे सांगितले होते.
याच दरम्यान तिने त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगविषयी माहिती सांगून त्यांना त्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवून फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुक करण्यास तयारी दर्शविली होती. त्यासाठी तिने त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांची माहितीसह मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्यांना एक युझर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. 22 ऑगस्ट ते 17 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत याच अकाऊंटवर त्यांनी एक कोटी दोन लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर संबंधित फॉरेक्स ट्रेडिंग अॅपवर मूळ रक्कमेसह प्रॉफिट मिळून 6,69,105.50 युएसडी रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.
ही रक्कम त्यांनी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे त्यांनी आराध्या सिंगला संपर्क साधला होता. यावेळी तिने त्यांना वीस रक्कम आधी टॅक्स म्हणून भरावी लागेल. नाहीतर त्यांना मूळ रक्कमेसह त्यावरील नफा मिळणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी तिला ही रक्कम नसल्याचे सांगून त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. काही दिवसांनी तिने त्यांना संपर्क साधणे बंद करुन त्यांना ब्लॉक केले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक विभागातील अधिकार्यांना घडलेला प्रकार सांगून आराध्या सिंगसह इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढत असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी समीर पासनकर आणि अखिल शेख या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम नंतर त्यांनी संबंधित सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. गुन्ह्यांतील सायबर ठगांच्या ते दोघेही संपर्कात होते, फसवणुकीसाठी त्यांनी त्यांना बँक खात्याची माहिती पुरविले होते. हा प्रकार उघडकीस येताच या दोघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.