विवाहीत महिलेवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी गजाआड

पिडीत व आरोपी दोघेही मूकबधीर; सहा वर्षांनी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
विवाहीत महिलेवर लैगिंक अत्याचार करणारा आरोपी गजाआड
पिडीत व आरोपी दोघेही मूकबधीर; सहा वर्षांनी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – मालाड येथे राहणार्‍या एका विवाहीत महिलेवर झालेल्या लैगिंक अत्याचारप्रकरणी महेश नावाच्या एका आरोपीस गजाआड करण्यात वाकोला पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपीसह पिडीत महिला मूकबधीर असून सहा वर्षांपूर्वी आरोपीने तिला खाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. सहा वर्षांनी हा गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने गुरुवार 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिडीत महिला ही विवाहीत असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहते. 2019 साली ती सांताक्रुज येथील वाकोला परिसरात तिच्या परिचित नातेवाईकाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. तिथेच तिची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्याने तिला खाण्यातून काहीतरी दिले होते. ते खाल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.

हा प्रकार नंतर तिच्या लक्षात आला होता, मात्र तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मूकबधीर लोकांचा एक ग्रुप असून या ग्रुपमध्ये ते दोघेही सभासद होते. या ग्रुपवरुन तिला आरोपीविषयी माहिती समजली होती. त्याचे महिलांविषयी वर्तणुक वाईट असल्याचे निदर्शनास येताच तिने सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती तिच्या पतीला सांगितली होती. त्यानंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या आठवड्यात तिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सांताक्रुज परिसरात घडल्याने त्याचा तपास वाकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. तपास वाकोला पोलिसांकडे येताच पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत आणि आरोपी दोन्ही मूकबधीर असून तपासासाठी अशाच एका व्यक्तीची पोलिसांकडून मदत घेतली आहे. त्यातून आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. दोघांची लवकरच पोलिसांकडून मेडीकल होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page