हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस सतरा वर्षांनी अटक

अ‍ॅण्टॉप हिल येथे येताच आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस सतरा वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दुर्गेश ऊर्फ छोटू अवदेश गौडा असे या आरोपीचे नाव असून तो अ‍ॅण्टॉप हिल येथे एका मित्राला भेटण्यासाठी आला होता, यावेळी पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर दुर्गेशला पुढील कारवाईसाठी मुलुंड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार यांनी सांगितले.

1 ऑक्टोंबर 2008 रोजी राजेश सोनी लखवाणी याची चारजणांच्या एका टोळीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. राजेशचे आरोपींशी ड्रग्जच्या एका व्यवहारात वाद झाला होता. या वादातून आरोपींनी राजेशचा गेम करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुलुंड कॉलनीच्या डांगरपाडा, पाईपलाईन परिसरात गाठून त्याची आधी लाथ्याबुक्यांनी आणि नंतर चाकूने वार करुन हत्या केली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोही मोहीम सुरु असताना अरुण अन्नपा कुंचीकोर ऊर्फ कन्ना ऊर्फ राजा गणेश देवेंद्र आणि सनी ऊर्फ अंजिक्य जानकीदार कबाडे या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

याच गुन्ह्यांत दुर्गेशसह इतर एका आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध नंतर पोलिसांनी मुलुंडच्या लोकल कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. यावेळी पाहिजे आरोपीविरुद्ध पोलिसांनी वॉरंट जारी करुन त्यांच्या अटकेचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहाय्यक फौजदार अरुण उघाडे, पोलीस हवालदार प्रमोद मोरे, पोलीस शिपाई अनिल पवार यांनी या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना यातील एक आरोपी दुर्गेश हा अ‍ॅण्टॉप हिल येथील रावळी कॅम्प परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून र्दुेश गौडा याला शिताफीने अटक केली.

चौकशीत तो हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. राजेश लखवानीची हत्या केल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता. याच दरम्यान तो प्लंबरचे काम करत होता. त्याचे एका विवाहीत महिलेशी प्रेमसंंबंध होते. त्याला ड्रग्जचे व्यसन होते. 2014 रोजी त्याने एक घरफोडी केली होती. याप्रकरणी अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित केले होते. गेल्या सतरा वर्षांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अ‍ॅण्टॉप हिल येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुलुंड पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page