सातारा एमडी ड्रग्ज फॅक्टरीप्रकरणी सातजणांना अटक

इतर आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेची विशेष मोहीम

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – सातारा येथे एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर गुन्हे शाखेने मुंबईसह भाईंदर आणि आसाम येथून आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. सलीम शेख, रईस शेख, विशाल मोरे, कुरी विला चेरियाण, कायम सय्यद ऊर्फ सद्दाम, राजीकुल रेहमान आणि हाविजुल इस्लाम अशी या सातजणांची नावे आहेत. अटकेनंतर या आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावी आहे. या कटातील काही मुख्य आरोपीसह इतर आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी सलीम शेख आणि रईस शेख या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने अटक केली. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 136 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. त्यांच्या चौकशीतून विशाल मोरे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने विशालला पुण्यातून अटक केली. चौकशीत सलीम आणि रईस हे दोघेही विक्रोळीचे तर विशाल पुण्याचा रहिवाशी असून विशालने त्यांना एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. सातारा येथून विशालने एमडी ड्रग्ज आणले होते. याच ड्रग्जची तो त्याच्या सहकार्‍याचंया मदतीने मुंबईसह इतर शहरात विक्री करत होता. त्यांच्या चौकशीत सातारा येथील जावळी, बामनोलीच्या सावरीगावात एका शेतातील प्लॅस्टट नसलेल्या विटांच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते.

या माहितीनंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी साडेसात किलो एमडी ड्रग्ज, 38 किलो एमडीचे लिक्वीड आणि इतर कच्चा माल असा सुमारे 115 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता. तपासात आरोपींनी शेतातील एका जागेवर शेड बांधून तिथे एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आले होते. याच गुन्ह्यांतील भाईंदर आणि आसाममधील काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पथकाने भाईंदर येथून कुरी चेरियाण तर आसाम येथून कायम सय्यद आणि राजीकुल रेहमान आणि हाविजुल इस्लाम या चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या चौघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या आरोपींना रविवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत या शेतजमिनीचा मालक गोविंद बाबाजी सिंदकर असून ही जागा त्यांनी ओमकार तुकाराम दिघे यांच्या मार्फत सद्दाम नजर अब्बास सय्यद यांना भाडेतत्त्वावर दिली होती. त्यानंतर तिथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु करण्यात आला होता. या कारखान्यातून तयार झालेले एमडी ड्रग्ज नंतर मुंबईसह इतर शहरात तसेच राज्यात विक्रीसाठी पाठविला जात होता. एमडी ड्रग्ज खरेदी-विक्री करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले आहे.

या टोळीतील इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने कारखान्यात किती किलो एमडी ड्रग्ज तयार केले, त्याची कुठल्या शहरात कुठल्या पेडलरच्या मदतीने कधी आणि किती विक्री केली, या टोळीचा म्होरक्या कोण, त्याचे कुठल्या राजकीय पक्षांशी संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page