मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 डिसेंबर 2025
मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) – पंधरा वर्षांपूर्वी शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका मूक-बधीर महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या 45 वर्षांच्या आरोपीस गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत कुरार पोलिसांच्या विशेष पथकाने विरार येथून अटक केली. महेश असे या आरोपीचे नाव असून तो विरारचा रहिवाशी आहे. त्याच्यावर पाच ते सहा महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असून या आरोपांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अटकेनंतर महेशला पुढील कारवाईसाठी वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस केाठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिडीत महिला ही मालाड येथे राहते. पंधरा वर्षांपूर्वी ती वाकोला येथे एका नातेवाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. तिथेच तिची आरोपीशी ओळख झाली होती. त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. ते शीतपेय प्यायल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली होती. ही संधी साधून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते. हा प्रकार नंतर तिला समजला होता, त्याने तिला तिचे अश्लील व्हिडीओ दाखवून धमकी दिली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. पिडीत महिला त्यांच्या मूकबधीर असलेल्या एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सक्रिय होती.
या ग्रुपमध्ये इतर काही महिला होत्या. या ग्रुपवरुन तिला महेशने तिच्यासह इतर पाच ते सहा महिलांवर अशाच प्रकारे कृत्य केल्याचे समजले होते. त्यानंतर तिने तिच्या पतीला पंधरा वर्षांपूर्वी घडलेा प्रकार सांगितला. पत्नीकडून ही माहिती समजल्यानंतर त्यांनी कुरार पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर ते दोघेही कुरार पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कुरार पोलिसांना आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर कुरार पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना महेश हा विरार येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय घोळवे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस अंमलदार बबन राठोड, श्रीकांत गोरे, बाळा वैराळ, संतोष फडतरे, भोगले आदी पथकाने विरार येथून महेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने पिडीत महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तसेच तिचे अश्लील व्हिडीओ बनविल्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. महेश हादेखील मूकबधीर असून सध्या तो विरारच्या कल्पवृक्ष कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये राहतो. हा गुन्हा सांताक्रुज परिसरात घडल्याने त्याचा ताबा नंतर वाकोला पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. हा गुन्हा वर्ग होताच त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवार 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात या गुन्ह्यांत महेशच्या एका मित्राचा सहभाग उघडकीस आला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच अवघ्या बारा तासांत कुठलाही पुरावा नसताना महेश या आरोपीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय घोळवे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस अंमलदार बबन राठोड, श्रीकांत गोरे, बाळा वैराळ, संतोष फडतरे, भोगले आदी पथकाने शिताफीने अटक केली होती. या पथकाचे वरिष्ठांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी कौतुक केले होते.