हत्येच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड आरोपीस चेन्नईतून अटक
जागेच्या वादातून 41 वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली होती
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 डिसेंबर 2025
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत गेल्या एक वर्ष महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन आरोपींना वडाळा टीटी पोलिसांच्या एका विशेष पथकाने चेन्नईतून अटक केली. भरत ऊर्फ राहुल रमेश सोलंकी आणि विल्यम लियो जोसेफ अशी या दोघांची नावे आहेत. हत्येनंतर ते दोघेही वेगवेगळ्या राज्यात वास्तव्यास होते, अखेर या दोघांना चेन्नईतून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने तीन दिवसांची ट्रान्झिंट रिमांड दिली असून या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.
कल्लन चिंकू चौधरी हे वडाळ्यातील विजयनगर, दुर्गा माता मंदिराजवळ राहत असून ते मॅकनिक म्हणून काम करतात. त्यांचा जावेद कल्लन चौधरी (41) हा मुलगा आहे. सायनच्या प्रतिक्षानगर, अल्मेडा कंपाऊंड परिसरात त्यांच्या मालकीचे एक गॅरेज आहे. सोसायटीलगत हा गॅरेज असल्याने त्याच्या जागेच्या वादातून चौधरीसह आरोपींमध्ये वाद होता. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. 3 सप्टेंबर 2024 रोजी याच जागेवरुन जावेद याचे आरोपीशी वाद झालाहोता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. यावेळी वीसजणांच्या टोळीने जावेद चौधरी यांच्यावर केबल वायर, स्टॅम्प आणि बॅटने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चार आरोपींना अटक केली होती. त्यात विलास रामचंद्र शेलार, अजीत ऊर्फ देवा देवशंकर सिंह, सागर धर्मानंद मोहंती आणि गणेश व्येंकटू म्हात्रे यांचा समावेश होता. याच गुन्ह्यांत यमाजी लक्ष्मी श्रीमंदिलकर, विल्यम जोसेफ, भापिंदरपाल लुफा ऊर्फ लकी, राहुल सोलंकी, बंटी यांच्यासह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी पोलीस पथक गुजरात, कर्नाटक, आंधप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यात गेले होते.
मात्र आरोपी त्यांचे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते. तरीही पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. आरोपींच्या मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचे सीडीआर-एसडीआर काढण्यात आले होते. त्यात दोन आरोपींचे लोकेशन चेन्नईतील शालिमार गार्डनजवळील इंजमबक्कम परिसरात असल्याचे दिसून आले होते.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे, पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, येवले, पोलीस हवालदार मीर, ठोके, जाधव, भोसले, पोलीस शिपाई पाटोळे, शिंदे, भोसले, चौधरी आदी पथकाने तिथे तीन दिवस साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळीतिथे आलेलया भरत सोलंकी ऊर्फ राहुल आणि विल्यम जोसेफ या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. जावेदच्या हत्येत या दोघांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना अटक करुन तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी या दोघांनाही कोर्टाने तीन दिवसांची ट्रान्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. हत्येनंतर ते दोघेही एक वर्ष तीन महिने सतत पोलिसांना गुंगारा देत होते, मोबाईल क्रमांक बदलून स्वतचे अस्तित्व बदलनून राहत होते, अखेर या दोघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या पथकाने चेन्नई येथून शिताफीने अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.