व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देणारा झाकीर डॉट कॉम गजागाड

दोन पूत्रांच्या मदतीने दोन वर्षांत अकरा लाखांची खंडणी वसुली केली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 डिसेंबर 2025
मुंबई, – मालाडच्या मालवणीतील एका कन्स्ट्रक्शन व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देणार्‍या झाकीर हुसैन सफदरअली सय्यद ऊर्फ झाकीर डॉट कॉम या 50 वर्षांच्या आरोपीस सोमवारी मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर त्याच्या पूत्रांच्या मदतीने तक्रारदार व्यावसायिकाकडून दोन वर्षांत अकरा लाखांची खंडणी वसुली केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याचे दोन मुले आमीरअली झाकीर सय्यद आणि उमेद झाकीर सय्यद सहआरोपी आहेत. अटकेनंतर झाकीरला मंगळवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या पिता-पूत्रांनी अनेकांना खंडणीसाठी धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसुली केल्याने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरु आहे.

सलीम मोहम्मद गौस शेख हा त्याच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. पूर्वी तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता. मात्र कोरोनामुळे त्याचे काम बंद झाले होते. त्यामुळे त्याने जानेवारी 2021 पासून बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरु केला होता. चाळीच्या बांधकामाची दुरुस्ती करणे, छोट्या रुम बांधणे असे कंत्राट घेऊन दोन वर्षांत त्याने स्वतचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून त्याला मालवणी परिसरात अनेक लहान मोठे काम मिळत होते. याच दरम्यान जानेवारी 2021 रोजी त्याला झाकीर सय्यदचा फोन आला होता. यावेळी त्याने त्याच्या परिसरात बांधकाम करताना त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे.

बांधकाम करायचे असेल तर त्याला हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाहीतर त्याला तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे तो झाकीरला भेटण्यासाठी बीएमसी कॉलनी गेटजवळ भेटला होता. यावेळी झाकीरने त्याच्याकडे खंडणीची मागणी करताना ती रक्कम दिली नाहीतर त्याला मालवणीसह इतर कुठेही काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती. व्यवसाय वाढत असल्याने त्याने झाकीरशी वैर नको म्हणून त्याला ऑनलाईन पंधरा हजार पाठविले होते. त्यानंतर तो आणि त्याचे दोन्ही मुले आमीरअली आणि उमेद हे दोघेही त्याला सतत खंडणीसाठी धमकी देत होते. पैसे देण्यास उशीर झाल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची धमकी देत होते.

जानेवारी 2022 रोजी त्याने उधयकुमार गणेशन याच्या घराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते काम सुरु असताना तिथे झाकीर व त्याचे दोन्ही मुले आले आणि त्यांनी पैशांची मागणी सुरु केली. पैसे दिले नाहीतर त्यांना तिथे काम करता येणार नाही अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरु केलेले काम बंद केले होते. त्यानंतर सलीमने त्यांना 50 हजार रुपये दिल्यानंतर ते काम पुन्हा सुरु झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सलीम शेख याच्याकडे काहीच काम नव्हते. तरीही ते तिघेही त्यांना खंडणीसाठी सतत धमकी देत होते. जिवाच्या भीतीने त्यांनी पुन्हा त्यांना पैसे पाठविले होते.

अशा प्रकारे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2023 या कालावधीत त्याने त्यांना खंडणी स्वरुपात अकरा लाख चौदा हजार रुपये पाठविले होते. तरीही त्यांच्याकडून सतत धमकी येत असल्याने त्याने मालवणी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर फेब्रुवारी 2024 रोजी झाकीरसह त्याचे दोन मुले आमीरअली आणि उमेद यांच्याविरुद्ध पोलिसांनी कट रचून खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच गुन्ह्यांत झाकीर हा फेब्रुवारी 2024 पासून फरार होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. त्याने आतापर्यंत किती लोकांना खंडणीसाठी धमकी दिली, त्यांच्याकडून किती रुपये खंडणीची रक्कम वसुल केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page