कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोघांना कारावास

20 वर्षांच्या कारावासासह एक लाखांच्या दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 डिसेंबर 2025
मुंबई, – कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांत तीनपैकी दोन आरोपींना विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरवून कारावास सुनावली आहे. प्रविण दिलीप वाघेला आणि रामदास पांडुरंग नायक अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही 20 वर्षांच्या कारावासासह एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्षांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी 17 डिसेंबरला सेशन कोर्टाने दोन्ही आरोपींना शिक्षा ठोठावली आहे.

9 जानेवारी 2017 रोजी चेंबूर परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटचे पोलीस हवालदार हुंबे यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने छेडानगर, सर्व्हिस रोडवरील बसस्टॉपजवळ साध्या वेशात पाळत ठेवून प्रविण वाघेला याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 10 किलो 200 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्याची किंमत दोन कोटी चार लाख रुपये इतकी होती. त्याच्या चौकशीतून रामदास नायक याचे नाव समोर आले होते. त्याच्या मदतीने त्याने कर्नाटक येथील हवेरी, हनगल, कामनहल्ली परिसरात एक केमिकल प्लॉटमध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने रामदास नायक याला अटक केली होती.

त्याच्यासोबत या पथकाने कर्नाटक येथील एमडी ड्रग्ज कारखान्यात कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 40 लाखांचा एमडी ड्रग्जसहीत ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा मुददेमाल जप्त केला होता. या एमडी ड्रग्जची ते दोघेही फिरदोस रज्जाक नाथानी ऊर्फ फिरोज याच्या मदतीने विक्री करत होते. त्यामुळे या गुन्ह्यांत नंतर फिरोजला पोलिसांनी अटक केली होती. या तिन्ही कारवाईत पोलिसांनी सतरा किलो एमडी ड्रग्ज, एक होंडा सिविक कार, एक अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल, एक हजार लिटरचे रासायनिक द्रव्य, 261 किलो ब्रोमिन नावाचे केमिकल, अन्य चौदा लिटर केमिकल, एमडी ड्रग्जसाठी लागणारे साहित्य असा सुमारे साडेतीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता.

तपास पूर्ण होताच तिन्ही आरोपीविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने तीनपैकी प्रविण वाघेला आणि रामदास नायक या दोघांना दोषी ठरविले होते. 17 डिसेंबरला कोर्टाने दोन्ही आरोपींना 20 वर्ष कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या गुन्हयांचा तपास द्वितीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भालेकर, पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, उपनिरीक्षक चारु चव्हाण यांनी केला तर कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हवालदार रंगनाथ घुगे, संदेश मोहिते, महिला पोलीस शिपाई सुदक्षिणा नेहे, दिप्ती दरेकर, तानाजी खारे यांनी न्यायालयीन पाहिले तर सरकारी अभियोक्ता भगवान राजपूत यांनी कोर्टात पोलिसांच्या वतीने बाजू मांडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page