मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 डिसेंबर 2025
मुंबई, – बी. आर चौप्रा यांच्या बहुचर्चित महाभारत मालिकेत युधिष्ठर म्हणून नावारुपाला आलेला मालिका अभिनेता गजेंद्र चौहाण यांची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केली, मात्र फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी तातडीने कारवाई करुन फसवणुकीची रक्कम गोठविण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम गजेंद्र चौहाण यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली आहे. या कारवाईबाबत त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान या घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
69 वर्षांचे गजेंद्र चौहाण हे अंधेरीतील ओशिवरा, लोखंडवाला परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी अनेक मालिकासह हिंदी चित्रपटात काम केले असून त्यांची महाभारतातील युधिष्ठरची भूमिका प्रचंड गाजली होती. बुधवार 10 डिसेंबरला ते त्यांच्या घरी होते. फेसबुक पाहत असताना त्यांना डी मार्टची एक जाहिरात निदर्शनास आली होती. त्यात स्वस्तात ड्रायफ्रुट उपलब्ध असल्याची माहिती जाहिरात पेजवर होती. त्यांनी ड्रायफ्रुट ऑर्डर करण्यासाठी लिंक ओपन केली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आलाद होता.
हा ओटीपी क्रमांक ऑर्डर घेण्यासाठी टाकला असता काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून 98 हजार रुपये डेबीट झाले होते. याबाबत बँकेचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक आनंद पगारे, पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे, सहाय्यक फौजदार अशोक कोंडे, पोलीस हवालदार विक्रम सरनोबत यांनी तपास सुरु केला होता.
गजेंद्र चौहाण यांच्या बँकेची स्टेटमेंट पाहिल्यानंतर ही रक्कम राजोरपेमार्फत क्रोमामध्ये वळते झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संंबंधित पोलीस पथकाने संबंधित नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून ही रक्कम फ्रिज करण्याची विनंती केली होती. ईमेल आणिमॅसेजद्वारे केलेल्या विनंतीनंतर नोडल अधिकार्यांनी ही रक्कम संबंधित बँक खात्यात फ्रिज केली होती. ही रक्कम नंतर गजेंद्र चौहाण यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. फसवणुकीची रक्कम परत मिळाल्याने गजेंद्र चौहाण यांनी ओशिवरा पोलिसाचे आभार व्यक्त केले आहे.