खंडणीच्या गुन्ह्यांत मोक्का लावलेल्या दोघांना कारावास

खंडणी देण्यास नकार दिला म्हणून लुटमार करुन हल्ला केला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 डिसेंबर 2025
मुंबई, – खंडणीच्या गुन्ह्यांत मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या दोन आरोपींना विशेष मोक्का कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मारु यलप्पा कुंचीकुर्वे आणि सनी सुल्तान सिंग अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना दहा वर्षांचा सश्रम कारावासासह सतरा लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण करुन दोन्ही आरोपींना मोक्का कोर्टाने कारावासासह दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास करणार्‍या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

बिंदवास गोपीनाथ मिश्रा हे बोरिवली परिसरात राहत असून व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. ते दिवसभर रिक्षा चालवितात आणि रात्रीच्या वेळेस त्यांची पत्नी शारदा बिंदवास मिश्रा हिच्यासोबत न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, टॉमटो मार्केटसमोर पार्क केलेल्या रिक्षांचे देखरेख करण्याचे काम करतात. त्यासाठी प्रत्येक रिक्षाचालक त्यांना वीस रुपये देत होते. याच परिसरात मारु कुंचीकुर्वे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राहत असून तो त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होता. खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्याला तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकीच त्याने त्याला दिली होती.

मारुची परिसरात प्रचंड दहशत असल्याने त्याच्यविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करत नव्हते. त्याचाच तो गैरफायदा घेत होता. त्याच्या दशहतीमुळे त्यांनी त्याला तीन ते चार वेळा खंडणीची रक्कम दिली होती. तरीही तो त्यांना दरमाह पंधरा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल यासाठी धमकावत होता. 26 जानेवारी 2020 रोजी रात्री दिड वाजता मारु हा त्याचा सहकारी सनी सिंगसोबत तिथे आला होता. त्याने त्याला तलवारीसह चाकूचा धाक दाखवून पंधरा हजाराच्या खंडणीची मागणी केली होती. यावेळी बिंदवास मिश्रा यांनी त्याला खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यातून झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याला बेदम मारहाण करुन त्याच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि साडेतीन हजाराची कॅश असा 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

तसेच पोलिसांत तक्रार केल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर बिंदवास मिश्रा यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मारुसह सनी सिंग यांच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसह प्राणघातक हल्ला करुन लुटमार करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परिसरात दहशत निर्माण करणारा मारु हा रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच त्याच्याविरुद्ध अशाच इतर गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध नंतर मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी मोक्का कोर्टात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण होताच न्या. एन. आर प्रधान यांनी मारु कुंचीकुर्वे आणि सनी सिंग यांना दोषी ठरविले होते. याच गुन्ह्यांत त्यांना कोर्टाने दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह सतरा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल वडके, पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी तपास केला तर सरकारी वकिल विजय मालन यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पोलीस उपनिरीक्षक वसीम शेख, कोर्ट कारकून पोलीस हवालदार देवळेकर यांनी उत्तम पाठपुरावा केला. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिश गवळी, पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, धनंजय लिंगाडे यांनी सरकारी वकिलांशी योग्य समन्वय ठेवून आरोपींना कठोर शिक्षा होण्यास मदत केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page