मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ एप्रिल २०२४
मुंबई, – ड्रग्जच्या नशेत घरी आलेल्या मुलासोबत झालेल्या भांडणानंतर एका महिलेने तिच्याच मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरी परिसरात घडली. याप्रकरणी बिंदू शितलाप्रसाद दुबे या ५० वर्षांच्या महिलेस ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत रविवारी दुपारी तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. मृत मुलाचे नाव शिवकुमार शितलाप्रसाद दुबे असून ड्रग्ज सेवन करणे त्याच्या जिवावर बेतल्याचे बोलले जाते.
बिंदू ही मूळची उत्तरप्रदेशची रहिवाशी असून ती जोगेश्वरीतील शुक्ला कंपाऊंडमध्ये तिचे दोन मुले शिवकुमार आणि अंबुजकुमार यांच्यासोबत राहते. तिचे पती शितलाप्रसाद हे उत्तरप्रदेशात गावी राहतात तर अंबुजकुमार हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शिवकुमार हा काहीच कामधंदा करत नसून त्याला ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन लागले होते. अनेकदा तो ड्रग्जच्या आहारी घरी येत होता. त्यातून तिचे त्याच्यासोबत सतत खटके उडत होते. काही दिवसांपूर्वी त्याने ड्रग्जसाठी घरी चोरी केली होती. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. शनिवारी सायंकाळी शिवकुमार हा नेहमीप्रमाणे ड्रग्जच्या नशेत घरी आला होता. यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने बिंदूला हँगरने मारहाण केली होती. त्यामुळे तिनेही घरातील चाकूने त्याच्यावर छातीवर वार केले होते. त्यात शिवकुमार हा गंभीररीत्या जखमी झाला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या शिवकुमारला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बिंदूला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बिंदूविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून नंतर तिला अटक केली. शनिवारी शुक्ला कंपाऊंडमध्ये घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.