गोरेगाव-गोवंडीतील अपघातात वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू

एका चालकास अटक तर दुसर्‍या चालकाचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 डिसेंबर 2025
मुंबई, – गोरेगाव आणि गोवंडीतील दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मेराजमुद्दीन मैनूल हक शेख (59) आणि विशाल नागेंद्रप्रसाद शर्मा (24) यांचा समावेश आहे. याप्रकरणी शिवाजीनगर आणि आरे पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. गुन्हा दाखल होताच समीर शमशुल हक सिद्धीकी या डंपरचालकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली तर दुसर्‍या घटनेतील चालक अपघातानंतर पळून गेल्याने त्याचा आरे पोलिसाकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात शुक्रवारी 19 डिसेंबरला सकाळी पावणेनऊ वाजता गोवंडीतील शिाजीनगर, बाजीप्रभू देशपांडे मार्ग, राम मंदिराकधडे जाणार्‍या वाहिनीवरील राम मंदिर समोर झाला. अब्दुल माजिद अब्दुल अजीज हे मूळचे बिहारचे रहिवाशी आहे. त्यांच्या पत्नीची डिलीव्हरी असल्याने ते त्यांच्या पत्नी आणि मुलासोंबत गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या गोवंडीतील शिवाजीनगर, प्लॉट क्रमांक 27 मधील सासरी आले होते. मुंबईत राहत असल्याने ते सध्या त्यांचे सासरे मेराजउद्दीनसोबत वाशीनाका, चेंबूर येथील रुस्तमजी बाल मोरल या कंपनीत सुरक्षाक्षरक्षक म्हणून काम करत होते. शुक्रवारी सकाळी त्यांना कामावर सोडण्यासाठी त्यांचे सासरे मेराजउद्दीन हे त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. यावेळी मेराजउद्दीन हे स्कूटी चालवत होते तर ते त्यांच्या मागे बसले होते.

ही स्कूटी राम मंदिर समोरुन जात असताना अचानक भरवेगात जाणार्‍या कचर्‍याच्या डंपरने पाठीमागून येऊन त्यांच्या स्कूटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरची स्कूटीला धडक लागून ते दोघेही खाली पडले होते. डंपरचा चाक मेराजउद्दीनच्या डोक्यावरुन गेल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या मेराजउद्दीनला पोलिसांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अब्दुल माजिद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी समीर शमशुल हक सिद्धीकी या 24 वर्षांच्या डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नंतर जामिनावर सोडून देण्यात आला.

दुसरा अपघात शुक्रवारी 19 िउसेंबरला सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास गोरेगाव येथील आरे कॉलनी, युनिट क्रमांक सहा बसस्टॉपसमोर झाला. विशाल शर्मा हा तरुण गोरेगाव येथील पाचबावडी, राजीव गांधी नगर, कोयना वसाहतीत राहतो. शुक्रवारी सायंकाळी तो त्याच्या बाईकवरुन रॉयल पाम्सच्या दिशेने जात होता. त्याची बाईक युनिट क्रमांक सहा बसस्टॉपसमोर येताच एका दूधाच्या वाहनाने त्याच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

जखमी झालेल्या विशालला स्थानिक लोकांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आरे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळाहून पळून गेला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन त्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page