ब्लॉक ट्रेडिंग गुंतवणुकीच्या आमिषाने अकाऊंटटची 21 लाखांची फसवणुक
फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक पुरविणार्या सहकार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 डिसेंबर 2025
मुंबई, – चांगला परताव्याचे आमिष दाखवून ब्लॉक ट्रेडिंग ट्रेडिंग आणि डिस्काऊंटेड आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एका अकाऊंटटची सुमारे 21 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी पठाण फैसलखान नासीरखान या आरोपीस उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. फसवणुकीसाठी सायबर बँक खाती पुरविल्याचा पठाण नासीरखानवर आरोप आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रौनक विनोद देसाई हे बोरिवली परिसरात ाहत असून अकाऊंट म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणावरुन त्यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यांनी लग्न जुळविणार्या एका संकेतस्थळावर स्वतची माहिती दिली होती. 12 ऑक्टोंबरला त्यांना रिया मेहता नाव सांगणार्या एका महिलेने फे्रंड रिक्वेस्ट पाठविली होती. ही फे्ंरड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्यांची रियासोबत चांगली ओळख झाली होती. काही दिवसांत ते दोघेही चांगले मित्र झाले होते. अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक कामासह कुटुंबाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.
याच दरम्यान तिने त्यांना ब्लॉक ट्रेडिंग आणि डिस्काऊंटेड आयपीओच्या एका गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. त्यात तिने गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळाला आहे, त्यामुळे त्याने गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्यांची एमिलिया रेड या महिलेशी ओळख करुन दिली होती. तिने त्यांना एका खाजगी कंपनीची माहिती देताना त्यांच्या गुंतवणुकीवर वीस टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यांना त्यांचे नाव रजिस्टर करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन करुन रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या नेनीफिशरी बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यात गुंतवणुकीची रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे 21 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाल्याचे भासविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्याबाबत त्यांना मॅसेज पाठविला होता, मात्र रिया मेहता आणि एमिलिया रेड यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्या दोघीही वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर क्राईम हेल्पलाईनसह उत्तर सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पठाण नासीरखान याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात फसवणुकीची काही रक्कम त्याच्याच बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. ती रक्कम त्याने संबंधित सायबर ठगांना पाठविली होती. याकामी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.