विवाहबाह्य अनैतिक संबंधातून 45 वर्षांच्या महिलेची आत्महत्या

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत नातेवाईक प्रियकराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 डिसेंबर 2025
मुंबई, – विवाहबाह्य अनैतिक संबंधातून मानसिक नैराश्यातून एका 45 वर्षांच्या विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपविल्याची घटना सायन परिसरात उघडकीस आली आहे. घरात असतानाही या महिलेला आत्महत्येपासून परावृत्त न करणे, तिला वेळीच वैद्यकीय मदत न दिल्याप्रकरणी आरोपी प्रियकराविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सारस्वत नावाच्या 30 वर्षांच्या आरोपी नातेवाईक प्रियकराला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

25 वर्षांची तक्रारदार तरुणी सायनच्या प्रतिक्षानगर तिचे वडिल-आई आणि आणि वडिलांच्या आत्याचा आरोपी सारस्वत नावाच्या मुलासोबत राहते. आरोपी नात्याने तिचा काका लागतो. तिचे वडिल ग्रॅटरोडच्या एका कुरिअर कंपनीत तर तिच्या आईसह काका एका खाजगी कंपनीत मार्केट रिसर्चचे फ्रिलान्सर म्हणून कामाला आहे. 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबरला तिच्या आईला सुट्टी होती, त्यामुळे ती घरीच होती. 13 डिसेंबरला ती तिच्या कामासाठी घरातून निघून गेले. यावेळी घरात तिची आई आणि काका हे दोघेच होते. सायंकाळी पावणेआठ वाजता ती घरी आली होती. यावेळी तिला घराचा दरवाजा बंद दिसला. तिने दार ठोठावला,

मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर तिच्या काकाने दरवाजा आतून उघडत नाही, त्यामुळे तिला बाहेरुन जोरात धक्का देण्यास सांगितले. तिने दरवाज्याला जोरात धक्का दिला, मात्र दरवाजा उघडला नाही. ते सर्वजण तिथे सतरा वर्षांपासून राहत होते, मात्र असा प्रकार कधीच झाला नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने शेजारी राहणार्‍यांना मदतीसाठी बोलाविले होते. त्यानंतर त्यांच्या मदतीने तिने दरवाजा उघडला होता. त्यानंतर ती घरी गेली असता तिला हॉलमधील पंख्याला तिच्या आईने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिच्या आईच्या अंगावर कपडे नव्हते. ती पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत होती. घरातच तिचा काका बनियन आणि शॉर्ट पॅण्टवर होता.

हा प्रकार पाहिल्यानंतर ती प्रचंड घाबरली. तिचा आवाज ऐकल्यानंतर शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही माहिती नंतर स्थानिक रहिवाशांनी वडाळा टी टी पोलिसांना दिली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी तिच्या आईला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसर्‍या दिवशी तक्रारदार तरुणीने तिच्या आईचा मोबाईलची पाहणी केली होती. त्यात तिला तिच्या आई आणि काका यांच्यातील व्हॉटअप चॅट दिसले होते. त्यातून तिला त्यांच्यात विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे समजले.

तिच्या काकांचे लग्न ठरले होते, मात्र या लग्नाला तिच्या आईचा विरोध होता. त्याने ते लग्न मोडून तिच्या आईसोबत लग्न करावे यासाठी दोघांमध्ये वाद सुरु असल्याचे मॅसेजवरुन दिसून आले होते. त्यातून तिच्या आईने घरातून आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे आत्महत्येच्या वेळेस तिचा काका हा घरीच होता. मात्र त्याने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले नाही तसेच तिला कुठलीही वैद्यकीय मदत मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे तिच्या आईच्या मृत्यूला तिचा काकाच जबाबदार असल्याचे दिसून आले.

हा प्रकार नंतर तिने पोलिसांना सांगून तिच्या काकांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page