पूर्ववैमस्नातून 25 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या सराईत आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 डिसेंबर 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून विशाल दयाराम कोंकणे या 25 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपी तरुणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अंकुश कृष्णबहादूर सिंग या 21 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकुश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शनिवारी रात्री उशिरा पाऊणच्या सुमारास घाटकोपर येथील असल्फा, हिमालय सोसायटीसमोर घडली. याच सोसायटीमध्ये विशाल हा राहत असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध साकिनाका आणि घाटकोपर पोलीस ठाण्यात मारामारीसह दरोडा, अपहरण, हत्येचा प्रयत्नाचे आठहून गुन्ह्यांची नोंद होती. त्याचा भाऊ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याच परिसरातील शिवप्रभा सोसायटीमध्ये अंकुश हा राहत असून तोदेखील सराईत गुन्हेगार आहे. एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. या परिसरात त्यांची प्रचंड दहशत होती. त्यांच्यात एक जुना वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.
सहा महिन्यांपूर्वी अंकुश आणि विशाल यांच्यात पुन्हा प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर विशालसह त्याच्या भावाने अंकुशला बेदम मारहाण केली होती. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने तुझा कधी ना कधी गेम करणारच अशी धमकी दिली होती. शनिवारी रात्री विशाल हा मद्यप्राशन करुन त्याच्या सोसायटसमोरुन जात होता. यावेळी तिथे अंकुश आला. त्यानेही मद्यप्राशन केले होते. एकमेकांना पाहिल्यानंतर त्यांच्यात जुन्या कारणावरुन पुन्हा वाद झाला होता. याच वादानंतर अंकुशने विशालला चाकूने भोसकले. जवळपास वीस ते पंचवीस वार केल्यानंतर विशाल हा जागीच कोसळला होता.
या हल्ल्यानंतर अंकुश हा पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी रक्तबंबाळ झालेल्या विशालला जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अंकुशचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या सहा तासांत त्याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने पूर्ववैमस्नातून विशालची चाकूने भोसकून हत्या केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले असून या फुटेजमध्ये घडलेला प्रकार कैद झाला आहे. पुरावा म्हणून ते फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत.