झटपट पैशांसाठी बोगस कागदपत्रे बनवून देणार्या आरोपीस अटक
आतापर्यंत सातजणांना बोगस दस्तावेज बनवून दिल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 डिसेंबर 2025
मुंबई, – पैशांसाठी गरजू लोकांना विविध शासकीस विभागाचे बोगस कागदपत्रे बनवून देणार्या एका सायबर कॅके चालक आरोपीस कफ परेड पोलिसांनी अटक केली. सुजीतकुमार श्याम ठाकूर असे या 21 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने आतापर्यत सातजणांना बोगस कागदपत्रे बनवून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एका महिलेने चारित्र्य प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
हसीना सफीकुल खातून ही महिला कफ परेड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिने चारित्र्य पडताळीसाठी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. या अर्जात तिने तिचे काही वैयक्तिक कागदपत्रे सादर केले होते. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर तिच्या जन्मप्रमाणपत्रावरील क्यूआर कोड नेगीटिव्ह आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिच्या कागदपत्रांची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तिच्या आधारकार्डवरील फाँटमध्ये फरक दिसून आला. रेशनकार्डच्या छायाकिंत प्रतीवर कुटुंब प्रमुखाचे नाव या ठिकाणी आलिशा खातून असे तसेच पत्ता दिलेल्या शाईने वेगळ्या हस्ताक्षरने लिहिल्याचे दिसून आले.
तसेच तिचा जन्मप्रमाणपत्र बोगस होता. तिने उत्तरप्रदेशातून बारावीची परिक्षा दिली होती. मात्र बोर्ड सर्टिफिकेटची पाहणी केल्यानंतर तिचा सध्याचा घडीचा फोटो होता. एकूणच तिने सादर केलेले कागदपत्रे बोगस होते. त्यामुळे तिला सर्व कागदपत्रांची मूळ प्रत घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. यावेळी तिच्याकडे मूळ कागदपत्रे आढळून आले नाही. तिला ताब्यात घेऊन तिची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत तिने संबंधित सर्व कागदपत्रे कफ परेड येथील गणेशमूर्ती नगरातील साह कम्युनिकेशन या सायबर कॅफेमध्ये बनविल्याचे समजले.
या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुढे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत देवकर, पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत, पोलीस शिपाई प्रविण यादव, अनिल उदागे, सुधाकर फलके, वसीम शेख यांनी साह कम्युनिकेशन सायबर कॅफेमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी सायबर कॅफे चालक सुजीतकुमार ठाकूरला ताब्यात घेतले.
त्याच्या चौकशीत त्याने संगणकामध्ये विविध एडिटिंग टून आणि सॉफ्टवेअरचा वापर करुन मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रे बनविल्याचे उघडकीस आले. पैशांसाठी त्याने अनेक गरजू लोकांना विविध प्रकारची बोगस कागदपत्रे तयार करुन दिली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.