मनपासह कोर्टात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीसाठी धमकी

60 लाखांसाठी धमकी देणार्‍या पिता-पूत्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 डिसेंबर 2025
मुंबई, – खार येथील पुर्नविकास केेलेल्या दोन इमारतीच्या निष्कासनासाठी महानगरपालिका आणि कोर्टात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका बिल्डरसह स्थानिक रहिवाशांना पिता-पूत्राने 60 लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपी पिता-पूत्राविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कुणाल जयदीप भगत आणि जयदिप वासुदेव भगत अशी या दोघांची नावे असून ते दोघेही खार येथील रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे या पिता-पूत्राने बिल्डरकडून यापूर्वीच पाच लाखांची खंडणी घेतली होती, तरीही उर्वरित खंडणीसाठी ते दोघेही त्यांना धमकावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा खार पोलिसांकडून तपास सुरु आहे.

हैदरअली इमामहुसा नदाफ हे व्यवसायाने बिल्डर असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियासोबत खार परिसरात राहतात. सिताराम धाणू हे त्यांच्या परिचित असून ते वांद्रे येथील पाली हिल, साईसदन इमारतीमध्ये राहतात. त्यांचा खारदांडा परिसरात एक मोठा प्लॉट असून तिथे तळमजल्यासह दोन मजली अशा दोन इमारती आहेत. या इमारतीमध्ये 36 रुम असून दोन्ही इमारती जीर्ण झाले होते. त्यामुळे या इमारतीच्या पुर्नविकासासाठी सिताराम धाणू यांनी हैदरअलीची भेट घेतली होती. त्यांच्या विनंतीनंतर त्यांनी 2016 साली दोन्ही इमारतीच्या पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. याबाबत त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता.

तीन वर्षांपूर्वी या दोन्ही इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन स्थानिक रहिवाशांनी रुमचा ताबा देण्यात आला होता. सध्या दोन्ही इमारतीमध्ये सध्या 51 कुटुंब राहत आहेत. याच इमारतीच्या मागील साईकुटीर इमारतीमध्ये जयदीप आणि कुणाल यांचे कुटुंबिय राहतात. त्यांचे काम सुरु असताना त्यांनी त्यांच्या बांधकामाबाबत महानगरपालिकेत तक्रार केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे आधी पाच आणि नंतर आठ लाखांची मागणी केली होती. त्यांनी पैसे दिले नाहीतर त्यांनी बांधकाम केलेल्या इमारती निष्कासन करण्याची धमकी दिली होती. दोन्ही इमारतीचे 51 कुटुंब रस्त्यावर येऊ नये म्हणून त्यांनी त्यांना एप्रिल 2025 रोजी पाच लाख रुपये दिले होते.

मात्र ही रक्कम देऊन ते दोघेही त्यांच्याकडे सतत 34 लाखांची मागणी करत होते. उर्वरित 29 लाख रुपये द्या नाहीतर यापूर्वी दिलेले पाच लाख रुपये घेऊन जा असे सांगत होते. हा प्रकार त्यांनी साईसदन इमारतीच्या 51 कुटुंबियांना सांगून त्यांनाच उर्वरित पैसे देण्यास सांगितले होते. मात्र या रहिवाशांनी त्यांना खंडणीची रक्कम देण्यास नकार दिला होता. पुढे संबंधित प्रकरण कुणाल सरमळकर यांच्याकडे गेले होते. यावेळी भगत पिता-पूत्रासह स्थानिक रहिवाशांनी कुणाल सरमळकर यांच्या कार्यालयात एक मिटींग झाली होती. कुणालने इमारत निष्कासन करण्यासाठी महानगरपालिका आणि कोर्टात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली होती.

यावेळी स्थानिक रहिवाशांनी ही रक्कम करण्याची विनंती केली, मात्र कुणाल भगतने पैसे कमी करण्यास नकार दिला. ऑक्टोंबर 2025 रोजी जयदीप भगत यांनी मनपाच्या विरोधात रिट पिटीशन दाखल केले. त्यानंतर मनपाकडून स्थानिक रहिवाशांना इमारत निष्कासनबाबत सांगण्यात आले होते. त्यामुळे या रहिवाशांनी एका मध्यस्थाकडून भगत कुटुंबियांकडे विनंती केली. यावेळी जयदीप आणि कुणाल भगत यांनी त्यांच्याकडे 60 लाखांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय रिट पिटीशन मागे घेणार नाही अशी धमकी दिली होती.

तपासात कुणाल आणि जयदीप यांनी अशाच प्रकारे इतर इमारतीच्या बांधकामाबाबत तक्रारी करुन खंडणी स्वरुपात पैसे घेत असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकारानंतर हैदरअली नदाफ यांनी खार पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कुणाल भगत आणि जयदीप भगत या पिता-पूत्रांविरुद्ध खार पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page