मारामारीच्या गुन्ह्यांत बारा वर्षांपासून वॉण्टेड आरोपीस अटक
अकरा वर्षांपूर्वी गावी राहिल्यानंतर मुंबईत नोकरीसाठी आला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 डिसेंबर 2025
मुंबई, – मारामारीच्या गुन्ह्यांत गेल्या बारा वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. सादिक हुसैन गुलाम रसुल शेख असे या 31 वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो मूळचा वडाळ्याचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच सादिक हा त्याच्या गावी पळून गेला होता, एक वर्षांपासून तो नोकरीसाठी मुंबईत आला होता, तेव्हापासून तो गारमेटमध्ये काम करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.
2013 साली वडाळा टी टी पोलीस ठाण्यात सादिकसह इतर आरोपीविरुद्ध 324, 323, 504, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र गुन्हा दाखल होताच सादिक हा पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तो आझाद मोहल्ला परिसरातील एका शिलाई गारमेंटमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीचंद नेरकर, पोलीस हवालदार भोसले, पोलीस शिपाई कुबल यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून त्याचा शोध सुरु केला होता. यावेळी संगमनगर बीट चौकीजवळ संशयास्पद येणार्या एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने तोच सादिक असल्याचे पोलिसांना सांगितले. तपासात सादिक हा गुन्हा दाखल होताच मुंबईतून पळून गेला होता. काही अकरा वर्षांपासून तो त्याच्या प्रतापगड येथे वास्तव्यास होता. एक वर्षांपूर्वी तो मुंबईत आला होता. काहीच काम नसल्याने तो आझाद मोहल्ला येथील गारमेंटमध्ये नोकरीवर लागला होता.
त्याच्या आधारकार्डसह पॅनकार्डवरुन तो मारामारीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला 41 (1) कलमांतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.