शेअरमार्केटसंबंधित चार स्किममध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा
1.37 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी चौदाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 डिसेंबर 2025
मुंबई, – शेअरमार्केट संबंधित बोगस कंपनीच्या चार वेगवेगळ्या स्किममध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका निवृत्त वयोवृद्ध बँक कर्मचारी महिलेची अज्ञात सायबर ठगांनी 1 कोटी 37 लाख 51 हजार रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांजूरमार्ग परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या ग्रुप अॅडमिनसह चौदाजणांविरुद्ध पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
63 वर्षांच्या राधा सत्यसुंदर अय्यर ही वयोवृद्ध महिला कांजूमार्ग परिसरात राहते. ती एका खाजगी नामांकित बँकेतून निवृत्त झाली असून तिच्या पतीचा स्वतचा व्यवसाय आहे. त्यांचा एक मुलगा तो सध्या विदेशात नोकरीसह राहण्यास आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी ती तिच्या घरी होती. यूट्यूबवर शेअर ट्रेडिंग आयपीओबाबत जाहिरात पाहत असताना तिला या कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये 121 सभासद होते. काही दिवसांनी तिला ग्रुप अॅडमिनने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीसाठी तिला तीन ऑप्शन देण्यात आले होते.
त्यात कंपनीसाठी जास्तीत जास्त व्होट केल्यास कंपनीला होणार्या फायद्यातून सर्व सभासदांना प्रत्येक आठवड्याला पाच ते दहा हजार रुपयांचे कमिशन मिळेल, कॉल अॅपमध्ये कोणत्याही कंपनीसह म्युयचल फंडात पैसे गुंतवणुक केल्यास दहा टक्के परतावा मिळेल. तसेच कंपनी शेअर ट्रेडिंग आयपीओमध्ये काम करत सअल्याने त्यातील गुंतवणुकीवर चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या चारपैकी कुठलाही ऑप्शन निवडल्यास तिला चांगला फायदा होईल असे भासविणयात आले होते.
तिने कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कंपनीची लिंक ओपन करुन तिने कॉल ऑप्शन निवडला होता. त्यात तिने 80 हजार रुपये गुंतविले होते, या गुंतवणुकीवर तिला 88 हजार रुपये मिळाले होते. त्यामुळे तिला कंपनीवर विश्वास बसला होता. त्यामुळे तिने कंपनीच्या वेगवेगळ्या स्किममध्ये 1 कोटी 37 लाख 51 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तिच्या खात्यात मूळ रक्कमेसह परतावा रक्कम असे मिळून साडेतीन कोटी रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने काही रक्कम विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रक्कम तिला विड्रॉल करता आली नाही.
यावेळी ग्रुप अॅडमिनने दिड कोटी रुपये जमा केल्यास तिला शंभर टक्के मिळेल असे सांगण्यात आले. मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने पैसे भरण्यास नकार दिला होता. यावेळी त्याने पैसे भरले नाहीतर तिला तिची रक्कम मिळणार नाही असे सांगून तिला ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने पूर्व प्रादेशिक सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्याशी आतापर्यंत ग्रुप अॅडमिनसह चौदाजणांनी संपर्क साधला होता. त्यामुळे या सर्व चौदाजणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.