बँकेच्या लॉकरमधून 36 लाखांचे दागिन्यांसह नाणी, बिस्कीस चोरीला
एचडीएफसी बँकेत घडलेल्या घटनेने खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 डिसेंबर 2025
मुंबई, – बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेल्या सुमारे 36 लाखांचे सोन्याचे विविध दागिन्यासह नाणी आणि बिस्कीट तसेच रत्नडित सोन्याचे पेंडट असा सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीच्या घटनेने बँकेचे लॉकर आता सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. अंधेरीतील एचडीएफसी बँकेत घडलेल्या या घटनेने बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नाेंंदवून तपास सुरु केला आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची आजची किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये असल्याचे बोलले जाते. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते.
54 वर्षांचे अपूर्व नितीन शाह हे व्यावसायिक असून ते सध्या अंधेरीतील शास्त्रीनगरात राहतात. त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. पूर्वी त्यांचे कुटुंबिय गुलमोहर क्रॉस रोड, रोड क्रमांक सात, जुहू परिसरात राहत होते. या ठिकाणी असताना त्यांनी जुहू-वर्सोवा लिंक रोडच्या अमलतास अपार्टमेंटमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेत एक बचत खाते सुरु केले होते. 2013 रोजी त्यांना बँकेचे जुने इंपिरिया ग्राहक असल्याने लॉकरची मोफत सेवा दिली होती. ही नावजलेली बँक असल्याने त्यांनी लॉकर सुविधा घेतली होती. त्यानंतर त्यांना बँकेने 1064 क्रमांक लॉकर दिले होते. फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांनी लॉकरमध्ये विविध सोन्याचे नाणी, बिस्कीट, रत्नजडीत सोन्याचे पेंडट, सोन्याची चैन, बांगड्या, चांदीचे दागिने, महत्त्वाचे दस्तावेज असा लाखो रुपयांचा मुद्देमाल ठेवला होता.
कोरोनानंतर त्यांचे बँकेत जाणे बंद झाले होते. मात्र नंतर ते दैनदिन व्यवहारासाठी बँकेत जात होते. यावेळी त्यांनी लॉकरची पाहणी केली नवहती. याच दरम्यान बँकेने लॉकर रुमच्या पेटींग आणि इतर काम सुरु केले होते. याबाबत बँकेने त्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, मात्र बँकेने तशी कुठलीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी लॉकरमधील विविध सोन्याचे दागिन्यासह महत्त्वाचे दस्तावेज काढले नव्हते. 4 सप्टेंबर 2023 रोजी ते बँकेत लॉकर उघडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत बँकेचा लॉकर इंचार्ज साईराज हा होता. या दोघांनी त्यांच्याकडील चावीने लॉकर उघडले. लॉकर उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले बारा लाखांचे दोनशे ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बिस्कीट, नऊ लाखांच्या ऐंशी ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, साडेतीन लाखांची साठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, दिड लाखांची एक रत्नजडीत सोन्याचे पेंडट असा एकूण 36 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
यावेळी बँकेने त्यांचे लॉकर कोणीही उघडले नसल्याची हमी दिली. तरीही त्यांनी बँकेसह स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली होती. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ते चोरीबाबत बँकेत सतत पाठपुरावा करत होते. याच दरम्यान ते त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना पोलिसांत तक्रार करता आली नाही. अखेर अडीच वर्षांनंतर त्यांनी डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी चोरीस गेलेल्या मुद्देमालाची आजची किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीची नोंद केली आहे.
या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत फेब्रुवारी 2023 च्या पूर्वीच्या लॉकर रुममधील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करणार आहे. तसेच लॉकर रुमच्या पेटींगसह इतर कामासाठी आलेल्या सर्व कामगारांची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. बँकेतील लॉकरमधून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने बँक खातेदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.