बकर्यावरुन झालेल्या वादातून 55 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच दोन्ही बंधूंना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 डिसेंबर 2025
मुंबई, – बकर्याच्या मलमूत्र साफ करण्यावरुन झालेल्या वादातून मोहम्मद इक्बाल शेख या 55 वर्षांच्या व्यक्तीची त्यांच्याच शेजारी राहणार्या दोन बंधूंनी बेल्ट तुटेपर्यंत बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपी बंधूंना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इलियास मोहम्मद रईस कुरेशी आणि मोहम्मद रियाज मोहम्मद रईस कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बकर्यावरुन झालेल्या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता गोवंडीतील शिवाजीनगर, फैजून रसुल मशिदीजवळील रफिकनगर पार्ट एकमध्ये घडली. याच परिसरात मोहम्मद फैजान शेख हा तक्रारदार त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. मृत इक्बाल शेख हे त्याचे वडिल असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या घरासमोरच कुरेशी बंधू राहत असून त्यांनी जून महिन्यांत बकरी ईदनिमित्त पाळण्यासाठी बकरा खरेदी केला होता. तेव्हापासून ते दोघेही बंधू त्यांचा पाळीव बकरा त्यांच्या घरासमोरच बांधत होते. या बकर्याचे मलमूत्र इलियास हा त्यांच्या घरासमोरील नाल्यात ढकळत होता.
आठवड्याभरापूर्वीच या नाल्याचे काम झाले होते. त्यामुळे इलियास बकर्याचे मलमूत्र त्यांच्या घरासमोरच टाकत होता. याबाबत वारंवार सांगूनही तो बकर्याचे मलमूत्र साफ करत नव्हता. त्यामुळे त्याचे वडिल मोहम्मद इक्बाल हे बकर्याचे मलमूत्र साफ करत होते. 22 डिसेंबरला सकाळी पावणेअकरा वाजता त्यांचे कुरेशी बंधूंशी याच कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर इलियास आणि रियाज यांनी त्यांना बकरा तिथे बांधणार आणि साफ पण करणार नाही, तुम्हाला जे करायचे आहे ते करा अशी धमकी दिली. त्यातून त्यांच्यातील वाद विकोपास गेले आणि प्रकरण हाणामारीवर गेले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला होता.
यावेळी मोहम्मद इक्बाल यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने या दोघांना बेल्टने बेदम मारहाण केली. बेल्ट तुटेपर्यंत ते दोघेही त्यांना मारहाण करत होते. यावेळी मोहम्मद इक्बाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्य ेदाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी मोहम्मद फैजान शेख याच्या जबानीवरुन हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही कुरेशी बंधूंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मोहम्मद इलियास आणि मोहम्मद रियाज या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.