विनयभंगाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी दहा वर्षांनी अटक
जामिनावर बाहेर येताच पळून गेला व दहा वर्षांनी सापडला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – विनयभंगाच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. सोहेल नियाज अहमद खान असे या 30 वर्षांच्या आरोपीचे नाव असून जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. सतत पोलिसांना गुंगारा देणार्या सोहेलला अखेर दहा वर्षांनी अटक करण्यता पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.
सोहेल खान हा वडाळ्यातील अॅण्टॉप हिल, संगमनगर, जानकी मंदिराजवळील कोयला गल्लीतील रहिवाशी आहे. 2016 साली त्याच्याविरुद्ध 354, 325 भादवी कलमांतर्गत वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला लोकल कोर्टाने जामिन मंजूर केला होता. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता.
खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अटकपूर्व जामिन वॉरंट जारी करताना वडाळा टी टी पोलिसांना त्याच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली होती. मात्र सोहेल प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात होता. तरीही पोलिसांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोहेल हा मशिदबंदर परिसरात फुटपाथवर मोबाईल कव्हर विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीचंद नेरुकर, पोलीस हवालदार भोसले, पोलीस शिपाई कुबल, गजरे, गावडे यानी मशिदबंदर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून सोहेलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच विनयभंगाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या अटकेची माहिती त्याचे वडिल नियाज अहमद शौकतअली खान यांना देण्यात आली होती.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक
अन्य एका कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीस अटक केली. शुभमअशोक जयस्वार असे या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून चोरीची बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. आकाश पप्पू सिंग हा अॅण्टॉप हिल येथे राहतो. 20 डिसेंबरला त्याने त्याची बाईक एकविरा आई मित्र मंडळ, घोड्याच्या तबेल्याजवळ पार्क केली होती. ही बाईक रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते.
याप्रकरणी बाईक चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार मीर, जाधव, भोसले, पोलीस शिपाई पाटोळे, शिंदे, भोसले, चौधरी यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन काही तासांत पोलिसांनी शुभम जयस्वार या 20 वर्षांच्या तरुणाला अटक केली.
चौकशीत त्यानेच ही बाईक चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून चोरीची बाईक जप्त केली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बाईक चोरीसह जबरी चोरी आणि घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
