मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – मोबाईलवर चालणार्या एका हायफाय सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सुवर्णा नावाच्या एका वेश्यादलाल महिलेस पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सहा तरुणीची सुटका केली असून मेडीकलनंतर या सहाही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान सुवर्णाविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर तिला पुढील चौकशीसाठी भोईवाडा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
कर्जत येथे सुवर्णा नावाची एक महिला राहत असून ती मोबाईलवरुन सेक्स रॅकेट चालवते. ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये मुली पुरविण्याचे काम करत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सुवर्णाला संपर्क साधला होता. या बोगस ग्राहकाने तिच्याकडे त्याच्यासह त्याच्या पाच मित्रांसाठी मुलींची मागणी केली होती. यावेळी तिने प्रत्येक मुलीमागे पाच हजार रुपयांचा मोबदला घेणार असल्याचे सांगितले. त्यास ग्राहकाने होकार देत मुलींना घेऊन दादर येथे बोलाविले होते. त्यापूर्वी तिने सहा तरुणीचे त्याला व्हॉटअपवर फोटो पाठविले होते. ठरल्याप्रमाणे सुवर्णा ही सहा तरुणीसोबत दादर येथील डॉ. आंबेडकर रोड, बेवॉच बारजवळील उड्डपी ते मुंबई प्युअर वेज हॉटेलजवळ आली होती. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर गेल्यानंतर एका ग्राहकाने सुवर्णासोबत चर्चा सुरु केली होती. त्यांच्यात पैशांची देवाणघेवाण सुरु असतानाच तिथे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी सुवर्णासोबत असलेल्या सहा तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीत सुवर्णा ही मोबाईलवरुन सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन त्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी जात असल्याचे सांगितले. त्यासाठी सुवर्णा त्यांना प्रत्येक ग्राहकामागे दोन हजार रुपयांचे कमिशन देत होती.
तपासात ही बाब उघडकीस येताच सुवर्णाला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर तिला भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सहा तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. सुवर्णाच्या चौकशीतून पूजा आणि जागृती या दोन महिलांचे नाव समोर आले होते. त्या दोघीही मोबाईलवरुन मुली पुरविण्याचे काम करत असल्याचे उघडकीस आले. जागृती ही पुण्यात राहत असून या दोघींनी तिच्यासोबत चार तरुणींना पाठविले होते. त्यामोबदल्यात जागृतीला चार हजार रुपये कमिशन मिळणार होते. या गुन्ह्यांत दोघींना पाहिजे आरोपी दाखविण्यात असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.