बोगस योनो अॅपद्वारे मोबाईलचा एक्सेंस प्राप्त करुन फसवणुक
दहा लाखांना गंडा घालणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – बोगस योनो अॅपची लिंक पाठवून मोबाईलचा एक्सेंस प्राप्त करुन एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात महिलेने सुमारे दहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राणीकुमारी नावाच्या महिलेविरुद्ध सहार पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
68 वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला शिला राजा सुतार ही विलेपार्ले परिसरात तिच्या पती राजा सुतार यांच्यासोबत राहते. ती जे. जे हॉस्पिटलमध्ये सिस्टर इंचार्ज म्हणून निवृत्त झाली आहे. तिला तिच्या बँक खात्याची माहिती अद्यावत करायची होती, त्यामुळे तिने इंटरनेटवर योनो अॅपविषयी माहिती सर्च करण्याचा प्रयत्न केला होता. 12 डिसेंबरला तिला राणीकुमारी नावाच्या एका महिलेने कॉल केला होता. तिने तिच्या स्टेट बँकेतील कर्मचारी असल्याची बतावणी करुन तिला योनो अॅप डाऊनलोड करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिने तिला एक लिंक पाठविली होती.
ही लिंक ओपन करुन तिने तिला स्वतची माहिती अपलोड करण्यास सांगितले. याच दरम्यान त्यांच्यात दोन वेळा व्हॉटअप कॉल आणि सहा रेग्युलर कॉलवर संभाषण झाले होते. या संभाषणाची वेळ दोन तास एकावन्न मिनिट इतकी होती. योनो अॅपची लिंक पाठवून तिने सांगितले तसे तिने लिंकवरील माहिती अपलोड केली होती. ही माहिती अपलोड केल्यानंतर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर 2025 या दोन दिवसांत तिला बँकेतून काही ओटीपी आले होते. या ओटीपीच्या सहाय्याने तिच्या बँक खात्यातून सुमारे दहा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर झाले होते. पैसे डेबीट झाल्याचे बँकेकडून मॅसेज प्राप्त होताच तिला धक्काच बसला होता.
तिने कोणालाही मोबाईलवर आलेले ओटीपी शेअर केले नव्हते. हा प्रकार लक्षात येताच तिने सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून राणीकुमारी या तोतया बँक कर्मचारी महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तपासात राणीकुमारीने ती बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन शिला सुतार हिला बोगस योनो अॅपचे लिंक पाठविले होते. ही लिंक ओपन करुन तिने तिची वैयक्तिक माहितीसह इतर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिचा मोबाईल हॅक करुन तिने वेगवेगळ्या बँक खात्यात दहा लाखांची ही कॅश ट्रान्स्फर केली होती. ही रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची पोलिसांकडून माहिती काढली जात आहे.