मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथे एका विवाहीत महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह झुडपात सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अमिना इब्राहिम सिद्धीकी असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र पूर्ववैमस्नातून सूड घेण्यासाठी ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
अमिना ही तिचा पती इब्राहिम सिद्धीकी आणि चार मुलांसोबत घाटकोपर येथील कामराज नगरात राहत होती. तिचा पती चालक म्हणून काम करतो. बुधवारी सायंकाळी तिची नणंद तिच्या घरी आली होती. त्यानंतर ते दोघेही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर अमीना आणि तिची नणंद त्यांच्या घराच्या दिशेने निघून गेले होते. मात्र अमीना ही रात्री उशिरापर्यंत घरी आली नव्हती. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्याने पंतनगर पोलिसांना त्याची पत्नी मिसिंग असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमीनाचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अमीनाचा मृतदेह कामराजनगरातील एका झुडपात सापडला होता. तिच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. ही माहिती मिळताच पंतनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अमीनाला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी अमीनाचा पती इब्राहिम सिद्धीकी याच्या तक्रारीवरुन घाटकोपर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांचे दहा पथके कामाला लागली आहे.