अश्लील फोटोसह व्हिडीओ पाठवून विवाहीत महिलेची बदनामी
महिलेच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – अश्लील फोटोसह व्हिडीओ पाठवून एका विवाहीत महिलेला तिच्याच प्रियकराने ब्लॅकमेल करुन तिची बदनामी केल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन अस्लम शेख नावाच्या प्रियकराविरुद्ध मेघवाडी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
39 वर्षांची तक्रारदार महिला जोगेश्वरी येथे तिच्या पती आणि मुलीसोबत राहते. तिची सासू तिच्या सिंधुदुर्ग येथील गावी राहत असून ती अधूनमधून त्यांच्याकडे राहण्यासाठी येते. तिचे पती अंधेरीतील एका खाजगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. 2022 साली ती कल्याणच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची अस्लम शेख या तरुणाशी मैत्री झाली होती. दहा वर्षांनी अस्लम तिला पुन्हा मार्केटमध्ये भेटला होता. यावेळी त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
तिच्या आईला कॅन्सर असल्याने अस्लम तिला तिच्या आईच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत करत होता. सर्व काही सुरळीत सुरु असताना तीन वर्षांपूर्वी तिने अस्लमशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. याबाबत तिने त्याला सांगितले असता त्याने तिला तिला शिवीगाळ केली होती. तसेच ते दोघेही भेटल्यानंतर त्यांनी काढलेले सर्व फोटो तिच्या नवर्याला पाठवून त्यांच्यातील प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी दिली होती. अनेकदा संभाषणादरम्यान तो तिला अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यास सांगत होता. तो तिच्या पतीला त्यांच्या संंबंधाबाबत सांगेल या भीतीने तिने त्याला जून 2025 रोजी तिचा एक अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविला होता.
त्यानंतर तिने अस्लमला भेटून यापुढे तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नाही असे सांगून तिचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. यावेळी त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर तिचे चारित्र्य चांगले नसून तिचे अनेकांशी शारीरिक संबंध असल्याचे मॅसेज तिच्या पतीसह सासूला पाठवून त्याने तिची बदनामी केली होती. काही दिवसांनी त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठविला होता. तो फोटो आणि व्हिडीओ त्याने तिच्या पतीला दाखविला असता तिने ते डिलीट केले होते. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला.
अस्लमकडून तिला ब्लॅकमेल केले जात होते. तिची बदनामी करुन त्याने तिच्याशी संबंध ठेवले नाहीतर तिची आणखीन बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार मेघवाडी पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अस्लमविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.