मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – सुमारे ३५ लाख रुपयांच्या हिरेजडीत महागड्या घड्याळाचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पारसमल लोंढा या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच बीकेसी पोलिसांचे एक पथक दिल्लीला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन नंदलाल गोयंका हे नेपियन्सी रोड परिसरात राहत असून त्यांची स्वतची गोयका गिल्टराटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. ते डायमंड ज्वेलरी, घड्याळे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्या कंपनीचे कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. आरोपी पारसमल हा दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहत असून ते त्याला गेल्या दहा वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या सासर्यांनी त्यांची पारसमलशी ओळख करुन दिली होती. त्यामुळे त्यांची कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्याच्या मुलीच्या लग्नाला नितीन गोयंका हे दिल्लीला गेले होते. त्यावेळेस पारसमल हा दिल्लीतील श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. जानेवारी २०२० रोजी पारसमलने त्यांना फोन करुन दोन डायमंड रिस्टवॉच खरेदीबाबत विचारणा केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना ३५ लाखांचे दोन हिरेजडीत घड्याळ त्याच्या सांगण्यावरुन चेन्नई येथे कुरिअरद्वारे पाठवून दिले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी दोन्ही घड्याळाचे पेमेंट केले नाही. यावेळी त्याने त्यांच्याकडे आणखीन एका घड्याळ पाठविण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी आधीचा व्यवहार पूर्ण करा, मग घड्याळ पाठवितो असे सांगितले. यावेळी पारसमलने लवकर पेमेंट करतो असे सांगून पेमेंट केले नाही. चार वर्ष उलटूनही त्यांनी पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा घड्याळ पाठवून देण्यास सांगितले. मात्र त्यांनी ते घड्याळही परत केले नाही. अशा प्रकारे पारसमलने दोन हिरेजडीत महागडे घड्याळ खरेदी करण्याचा बहाणा करुन सुमारे ३५ लाखांचे पेमेंट न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पारसमल लोंढा याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच बीकेसी पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीला जाणार आहे.