वर्क व्हिसाच्या नावाने 37 लोकांची 1.63 कोटीची फसवणुक

दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या पती-पत्नीला अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
26 डिसेंबर 2025
मुंबई, – कॅनडा देशात नोकरीसाठी वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह 37 व्यक्तीकडून व्हिसासाठी घेतलेल्या 1 कोटी 63 लाख रुपयांना गंडा घालून पळून गेलेल्या आरोपी पती-पत्नीला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. रिना गौरव शहा आणि गौरव हसमुख शहा अशी या दोघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेले होते. अखेर दिड वर्षांनी या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असून त्यांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सारिका विश्वनाथ धर्माधिकारी ही महिला तिच्या आईसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी ती बोरिवलीतील फिनोट्रीक कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करत होती. तिला कॅनडा देशात नोकरी करण्याची इच्छा होती, त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिला मालाडच्या काचपाडा, अग्रवाल बीटूबी सेंटरमधील द व्हिसा मेंशनची एक जाहिरात दिसली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तिला त्यांच्या कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मे 2023 सारिका धर्माधिकारी द व्हिसा मेंशन कंपनीच्या कार्यालयात गेली होती. तिथे तिला सुनिता शेट्टी हिने कंपनीचे मालक रिना शहा आणि गौरव शहा असयाचे सांगितले. या दोघांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तिला कॅनडाचा वर्क व्हिसा सात लाखांमध्ये देण्याचे आश्वासन दिले होते. तिला कंपनीचा ईमेल आयडी देण्यात आला होता.

काही दिवसांनी तिला कॅनडामधील एका कंपनीची नोकरीसह इतर माहिती पाठविण्यात आली होती. मात्र ही कंपनी ठिक न वाटल्याने तिने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला दुसर्‍या कंपनीविषयी माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर तिने तिथे जाऊन संबंधित नोकरीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगून त्यांच्याकडे वर्क व्हिसा अर्ज केला होता. या वर्क व्हिसासाठी तिने त्यांना टप्याटप्याने सात लाख सोळा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. 11 जून 2024 रोजी तिला कंपनीने तिचा कॅनडाचा वर्क व्हिसा आल्याचे सांगितले. त्यामुळे ती महालक्ष्मी येथील कॅनडा दूतावास कार्यालयात व्हिसा घेण्यासाठी गेली होती.

यावेळी तिला तो वर्क व्हिसा नसून व्हिजीटर व्हिसा असल्याचे दिसून आले. त्यामुळे ती मालाड येथील कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेली होती, तिथे तिला द व्हिसा मेंशन कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. तिने कंपनीच्या कर्मचार्‍यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला कोणीही प्रतिसाद दिला नाही. चौकशीअंती तिला तिच्यासह इतर 36 लोकांना रिना आणि गौरव शहा यांनी कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देतो असे सांगून गंडा घातला होता. या 36 लोकांकडून वर्क व्हिसासाठी 1 कोटी 56 लाख 70 हजार 400 रुपये घेतल्यांनतर या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कंपनीच्या दोन्ही मालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रिना आणि गौरव शहा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या रिना आणि गौरव या दोघांनाही मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

अटकेनंतर त्यांना बुधवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांची त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनी मालाड परिसरात बोगस कंपनीचे कार्यालय सुरु असून वर्क व्हिसाच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page