मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 डिसेंबर 2025
मुंबई, – उपचारासाठी क्लिनिकमध्ये आलेल्या एका बारा वर्षांच्या मुलीवर महिला डॉक्टरनेच लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह विनयभंग व पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 44 वर्षांच्या आरोपी महिला डॉक्टरला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
पिडीत मुलगी ही बारा वर्षांची असून ती सध्या शिक्षण घेते. मालाडच्या मालवणी परिसरात ती तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिच्या तोंडाच्या ओठाला एक फोडी आली होती, त्यामुळे तिला प्रचंड त्रास होता. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ती जवळच असलेल्या आरोपी महिलेच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली होती. यावेळी या डॉक्टर महिलेने तिला तपासणीसाठी बेडवर झोपण्यास सांगितले. तिच्या ओठाला फोडी असताना तिने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या प्लाझोमध्ये हात घालून तिच्याशी लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकाराने पिडीत मुलगी प्रचंड घाबरली आणि ती क्लिनिकमधून निघून गेली होती. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर ते सर्वजण मालवणी पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डॉक्टर महिलेविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत रात्री उशिरा आरोपी डॉक्टर महिलेस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला गुरुवारी दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीवर एका महिला डॉक्टरने अत्याचार केल्याचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.