प्रॉपटीच्या वादातून 64 वर्षांच्या वयोवृद्धावर प्राणघातक हल्ला
अंमलदाराने जखमीचे प्राण वाचवून आरोपीला केली अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 डिसेंबर 2025
मुंबई, – लघुवाद कोर्टात सुरु असलेल्या खटल्यात आरोपीच्या ताब्यातील गाळा परत मिळाल्याच्या रागातून हेमंत भिकूलाल दलाल या 64 वर्षांच्या वयोवृद्धावर आरोपीने बांबूसह तिक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. हल्ल्यादरम्यान गस्त घालणार्या पोलीस अंमलदार अनिल दत्तू जाधव यांनी वेळीच तिथे धाव घेऊन हेमंत दलाल यांचे प्राण वाचविले आणि हल्लेखोर आरोपी रोशन रमेश पटेल ऊर्फ रोशन सिंग याला शिताफीने अटक केली. जखमी हेमंत दलाल यांच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहेत. अनिल जाधव यांच्या धाडसी कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.
ही घटना बुधवारी 24 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता खार रेल्वे स्थानकाजवळील निराव्हिला इमारतीसमोर घडली. हेमंत दलाल हे नालासोपारा येथे राहत असून त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची खार येथील निराव्हिला नावाची एक इमारत आहे. या इमारतीच्या एका गाळ्यावर आरोपी रोशन पटेल याने कब्जा केला होता. या गाळ्याच्या मालकी हक्कावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. याबाबत त्यांचा लघुवाद कोर्टात खटला सुरु होता. यावेळी कोर्टाने तिथे बेलिफची नेमणूक करुन रोशन पटेल याच्या ताब्यातील त्यांच्या मालकीचा गाळा सिल केला होता.
सिल केलेला गाळा नंतर हेमंत दलाल यांना परत करण्यात आला होता. याच गाळ्यावरुन हेमंत दलाल आणि रोशन पटेल यांच्यात पूर्वीपासून वाद सुरु होता. त्यात कोर्टाने त्याच्या ताब्यातील गाळा हेमंत दलाल यांना परत केल्याने त्याचा राग अनावर झाला होता. त्यामुळे रोशन त्यांना अनेकदा जिवे मारण्याची धमकी देत होता. सततच्या धमकीनंतर त्यांनी त्याच्याविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनतर दोन दिवसांपूर्वीच रोशन पटेलविरुद्ध पोलिसांनी एक अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती.
बुधवारी 24 डिसेंबरला ते वांद्रे येथे वकिलाला भेटून त्यांच्या इमारतीजवळ आले होते. यावेळी तिथे आलेल्या रोशनने त्यांच्याशी पुन्हा वाद घालून त्यांच्यावर बांबूने हल्ला केला. आज तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, हाताला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार तिथे गस्त घालणार्या पोलीस अंमलदार अनिल जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी तिथे धाव घेऊन रोशनला बाजूला केले. त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करुन वेळीच औषधोपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु झाले आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
अशा परिस्थितीतही त्यांनी हल्ला करणार्या रोशन पटेलला ताब्यात घेतले होते. त्याला नंतर पुढील तपासाकामी खार पोलिसांच्या स्वाधीन केले होते. अनिल जाधव यांच्यामुळे हेमंत दलाल वेळीच औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले होते, त्यात आरोपीला त्यांनी शिताफीने अटक केली होती. त्यांच्या या धाडसी कामगिरीची माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. यावेळी अंमलदार अनिल जाधव यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.