कौटुंबिक वादातून पत्नीवर पिस्तूल रोखून गळा आवळण्याचा प्रयत्न
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 डिसेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून पत्नीवर पिस्तूल रोखून तिचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. त्यात कमलजीतकौर बलबिरसिंग लांबा या 49 वर्षांच्या महिलेला दुखापत झाली होती. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पती बलबिरसिंग ऊर्फ गिन्नी लांबा याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत मुलुंडच्या लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मुलुंड येथील मुलुंड कॉलनी, मलबार हिल रोडवर घडली. याच मुलुंड कॉलनीतील 75/6 मध्ये कमलजीतकौर ही महिला तिच्या दोन मुलांसोबत राहत असून आरोपी बलबिरसिंग लांबा हा तिचा पती आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. या वादातून तो तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी तिने तिच्या पतीविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याला पोलीस ठाण्यात जमा केला होता. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता.
याच रागातून शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता त्याने कमलजीतकौरशी पुन्हा वाद काढला होता. या वादानंतर त्याने त्याच्याकडील पिस्तूल तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लावून तिची जोरात गळा आवळला होता. मात्र तिने त्याच्या तावडीतून स्वतची सुटका केली. त्यानंतर ती पुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात गेली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती बलबिरसिंग लांबा याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडे पिस्तूल असल्याचे उघडकीस आले असून ते पिस्तूल लवकरच पोलिसांकडून ताब्यात घेतले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.