मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ एप्रिल २०२४
मुंबई, – ऑन ड्युटी पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन दोन पोलिसांना मारहाण झाल्याची घटना गोरेगाव आणि शिवडी परिसरात घडली. यातील एका घटनेत आरोपीने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून स्वतला दुखापत करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बांगुरनगर आणि रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन दोन्ही आरोपींना अटक केली. जान्जेब सलीम खान आणि शाहबाज निजाम शेख ऊर्फ आदिल अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
स्वप्निल कातुरे हे भोईवाडा येथे राहत असून रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता जान्जेब हा २३ वर्षांचा तरुण पोलीस ठाण्यात आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा मोबाईल चोरीस गेला होता. त्याची तक्रार करण्यासाठी तो तिथे आला होता. मात्र पोलिसांनी त्याला वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो पोलीस ठाण्यातून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलिसांना त्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. यावेळी त्याने पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने माझा मोबाईल शोधून दिला नाहीतर तुमची वाटच लावतो अशी धमकी देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी स्वप्निल कातुरे यांच्याशी वाद घालून त्यांच्या नाकावर जोरात ठोसा लगावला. स्वतचे डोके टेबलावर आपटून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डोक्याला दुखापत झाल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकारानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना गोरेगाव येथे घडली. शिवराम प्रभाकर बांगर हे बांगुरनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री उशिरा ते महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी गोरेगाव येथील लिंक रोड, स्नेहा बारसमोर वाहतूक विस्कळीत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिे दोन तरुण आपसांत हाणामारी करत होते. एकमेकांना शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याने तिथे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे त्यांनी या दोघांची समजूत काढून त्यांच्यात भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदिलने त्यांनाच शिवीगाळ करुन पोलिसांविषशी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानतर त्याने त्यांची कॉलर पकडून मारहाण केली होती. या घटनेनंतर शिवराम बांगर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बळाचा वापर करुन आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले. चौकशीत त्याचे नाव शाहबाज शेख ऊर्फ आदिल असल्याचे उघडकीस आले. तो व्यावसायिक असून तो ओशिवरा येथील गावदेवी इमारतीमध्ये राहतो. याप्रकरणी शिवराम बांगर यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करुन मारामारी करणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.