मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – घरी जाणार्या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या परिचित एका आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या 28 आणि 30 वर्षांच्या दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा कुरार पोलिसांनी अटक केली. त्यात लैगिंक अत्याचार करणार्या मुख्य आरोपीसह त्याला गुन्ह्यांत मदत करणार्या आरोपीचा समावेश आहे. अटकेनंतर या दोघांनाही दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
50 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहत असून ते मजुरीचे काम करतात. पिडीत चौदा वर्षांची त्यांची मुलगी आहे. याच परिसरात त्यांचे नातेवाईक राहतात. शुक्रवारी 26 डिसेंबरला त्यांची मुलगी जवळच असलेल्या त्यांच्या भाच्याच्या घरी गेली होती. रात्री साडेअकरा वाजता ती त्यांच्या घरातून निघाली आणि तिच्या घरी जात होती. याच दरम्यान तिच्या परिचित दोन्ही आरोपींनी तिला जबदस्तीने त्यांच्या घरी आणले. तिथे तिला धमकावून त्यापैकी एका आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता तर दुसर्या आरोपीने त्याला याकामी मदत केली होती.
हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे ठार मारु अशी धमकी देऊन त्यांनी तिला साडेबारा वाजता सोडून दिले होते. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार पित्याला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर ते त्यांच्या मुलीसोबत कुरार पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिची मेडीलक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींचीही आता पोलिसांकडून मेडीकल होणार आहे.