अंधेरीत दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

भेसळयुक्त दूधासह महिलांसह सातजणांवर कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील चार बंगला परिसरात दूधात भेसळ करणार्‍या एका टोळीचा वर्सोवा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सातजणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. रवि अंजया कलिमारा, व्यंक्यया यदयया बैरु, जवाजी श्रीनिवास, रामलिंगय्या गज्जी, नरसिम्हा रामचंद्र कोलापल्ली, रजनी भास्कर बतुला आणि मंजुला रमेश जवाजी अशी या सातजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी सांगितले.

दूध भेसळीविरुद्ध राज्य शासनाने कठोर कारवाई केली असताना काही ठिकाणी अद्याप दूध भेसळीचा प्रकार सुरु आहेत. या भेसळयुक्त दूधाची विक्री करुन सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात होता. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध वरिष्ठांनी सक्त कारवाईचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते. ही कारवाई सुरु असताना अंधेरीतील चार बंगला परिसरात काहीजण दूधात भेसळ करत असून या भेसळयुक्त दूधाची परिसरात विक्री आणि वितरण केले जात असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक दाभोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे, पोलीस शिपाई नसरुद्दीन इनामदार, किंजळकर, जाधव यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, नितीन सानप, अन्न व सुरक्षा अधिकारी अनन्या रेगे, योगेश देशमुख, जयकुमार पाटील, श्रीपाद धरगुन्ती, आकाश चव्हाण, अविनाश जाधव, निलेश माळी, सुदर्शन सुरवसे, शशांक दडस, हृषिकेश दर्शनवाड, अभिजीत धनावडे, सागर दनाणे, छत्रपालसिंग राजपूत, समाधान जाधव, अशितोष खोले, रामू माळी आदी पथकासह चार बंगला संत लुडस मार्ग, नवजीतनगर रहिवाशी संघातील तीन ते चार रुममध्ये पोलिसांनी छापा टाकला होता.

या कारवाईदरम्यान तिथे उपस्थित पुरुष आणि महिला अमुल आणि गोकुळ या विविध नामांकित दूध कंपन्यांच्या दूधात भेसळ करताना दिसून आले. या कारवाईत पोलिसांनी 958 लिटर भेसळ दूधासह भेसळीसाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नसरुद्दीन इनामदार यांच्या तक्रारीवरुन सातही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे यांनी दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page