तीन कर्ज असलेल्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जानेवारी 2026
मुंबई, – एकाच फ्लॅटवर तीन वेगवेगळे कर्ज काढून कर्जाची माहिती लपवून फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका व्यावसायिकाची पती-पत्नीने सुमारे 74 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आनंद विरेंद्र चक्रवर्ती ऊर्फ राज आणि रितू आनंद चक्रवर्ती अशी या दोघांची नावे असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिपक प्रमोद शहा हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांचा चावी मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. त्यांचे राहते घर लहान असल्याने त्यांचा मोठा फ्लॅट खरेदी करायचा होता. फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना एका ब्रोकरने आनंदा चक्रवर्तीशी ओळख करुन दिली होती. त्याच्या मालकीचा सांताक्रुज येथील सीएसटी रोड, सुजाता अपार्टमेंटमध्ये सी विंगमध्ये 10 क्रमांकाचा फ्लॅट होता. याच फ्लॅटची त्याला विक्री करायची होती. त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणापासून फ्लॅटचे लोकेशन जवळ होते, त्यामुळे फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी आनंदच्या मालकीचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या फ्लॅटवर त्यांना गृहकर्ज घ्यायचे होते, त्यामुळे त्यांनी एका खाजगी बँकेत गृहकर्जासाठी अर्ज केला होता, यावेळी बँकेने त्यांना एक कोटीचे कर्ज मंजूर केले होते.

याच दरम्यान त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा पावणेदोन कोटी रुपयांमध्ये सौदा झाला होता. चर्चेनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर दिपक शहा यांनी आनंद आणि त्याची पत्नी रितू चक्रवर्ती यांना टप्याटप्याने जुलै ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीत 73 लाख 31 हजार 970 रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांनी कर्जासाठी प्रयत्न सुरु केले होते. याच दरम्यान त्यांना आनंदच्या फ्लॅटवर एका खाजगी बँकेचे तीन वेगवेगळे कर्ज घेतल्याचे तसेच त्याच्या कर्जाची रक्कम 1 कोटी 11 लाख रुपये असल्याचे समजले होते. यावेळी त्याने तिन्ही कर्ज क्लिअर करुन त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.

कर्जासाठी सोसायटीची एनओसी आवश्यक असल्याने त्यांनी त्यांच्याकडे एनओसीची मागणी सुरु केली होती, मात्र आनंद वेगवेगळे कारण सांगून त्यांना एनओसी देत नव्हता. त्यामुळे त्यांनी सोसायटीमध्ये जाऊन चौकशी केली होती, यावेळी त्यांना आनंदकडून सोसायटीची 2 लाख 32 हजार 970 रुपयांची थकबाकी असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी ही रक्कम सोसायटीच्या कार्यालयता जमा केली होती. काही दिवसांनी आनंद आणि रितू हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांचे तिन्ही कर्ज क्लिअर करुन फ्लॅटचा ताबा देण्यास सांगितले होते.

याच दरम्यान त्याने त्याच्या फ्लॅटवर दुसर्‍या व्यक्तीला भाडेकरु म्हणून ठेवले होते. त्याच्याकडून पैसे घेतल्यानंतर भाडेकरु फ्लॅटचा सोडण्यास नकार नव्हता. अशा प्रकारे आनंद आणि रितू यांनी फ्लॅटवर तीन कर्ज असल्याची माहिती लपवून फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला. याच फ्लॅटसाठी त्यांच्याकडून घेतलेल्या 74 लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच दिपक शहा याने आनंद आणि त्याची पत्नी रितू चक्रवर्ती यांच्याविरुद्ध वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या जोडप्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page