तीन वेगवेगळ्या घटनेत तिघांना घातक शस्त्रांसह अटक
वांद्रे, आरसीएफ व चेंबूर पोलिसांची धडक कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – शहरात तीन वेगवेगळ्या घटनेत शुक्रवारी दिवसभरात तिघांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, दोन देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. नदीम निसार शेख, लक्ष्मण मोहनाला मारवाडी आणि मनोज जवाहर वर्मा अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वांद्रे, आरसीएफ आणि चेंबूर पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. या घातक शस्त्रांचा शहरात विविध गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा प्रकारे शस्त्रांची विक्री करणार्या आरोपीविरुद्घ पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना आरसीएफ पोलिसांनी नदीम शेख या 26 वर्षांच्या तरुणाला अटक केली. नदीम हा चेंबूर येथील ईस्टर्न फ्रिवे, शरद आचार्य उद्यानाजवळ घातक शस्त्रे घेऊन आला होता.
यावेळी एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुतार, पोलीस हवालदार उत्तम पेटकर, पोलीस शिपाई खांडके, नेमाने यांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्यात त्याच्या अंगडतीत पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि तीन काडतुसे सापडली. नदीम हा गोवंडीतील डॉ. जाहीर हुसैन नगर, नूराणी मशिदीजवळ राहत असून चालक म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
दुसर्या कारवाईत वांद्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आचरेकर, पोलीस शिपाई चतुर, पाटील, मच्छिंद्र सांगवे हे शुक्रवारी सायंकाळी परिसरात गस्त घालत होते. सायंकाळी एस. व्ही रोड, वांद्रे तलावाजवळ पोलिसांनी लक्ष्मण मारवाडी याला ताब्यात घेतले होते. पोलिसांना पाहताच तो पळून जात होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे पोलिसांना एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि दोन काडतुसे सापडले. लक्ष्मण हा वांद्रे येथील पटेलनगरी, बसडेपोजवळील फुटपाथवर राहतो.
तिसर्या कारवाईत पोलिसांनी मनोज वर्मा या 30 वर्षांच्या आरोपीस अटक करुन त्याच्याकडून एक विदेशी पिस्तूल आणि एक काडतुस जप्त केले. मनोज हा उत्तरप्रदेशच्या गाझियाबादचा रहिवाशी असून सध्या तो चेंबूर येथील अमर महल ब्रिज सिग्नलजवळ राहतो. शुक्रवारी तो मिट्टी गार्डनजवळ शस्त्रांची विक्रीसाठी आला होता. मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू गायकवाड, पोलीस शिपाई बारगजे यांनी संशयावरुन ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडे घातक शस्त्रे सापडले.
या तिघांविरुद्ध तीन स्वतंत्र घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांनाही शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.