वेश्याव्यवसाय करणार्या दोन बांगलादेशी महिलांना अटक
साकिनाका पोलिसांची कारवाई; बोगस आधारकार्डची चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – मुंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी महिलांना साकिनाका पोलिसांनी अटक केली. रजिया आणि पॉली अशी या दोन्ही महिलांची नावे असून बांगलादेशातील बेरोजगारीसह उपासमारीला कंटाळून त्या दोघीही गेल्या एक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होते. नोकरी न मिळाल्याने त्या दोघीही साकिनाका परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघींकडून पोलिसांनी दोन बोगस आधारकार्ड सापडले असून या आधारकार्डची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांना ते आधारकार्ड कोणी बनवून दिले याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
साकिनाका येथील तिलकनगर परिसरात परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती साकिनाका पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस शिपाई रमेश अहेर, पुलाते, तांबे, गवारे, महिला पोलीस शिपाई शिंदे, रेडेकर आदी पथकाने साकिनाका येथील 90 फिट रोड, तिलकनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी तिथे दोन महिला आल्या. या दोन्ही महिलांची हालचाल संशयास्पद वाटत होती, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी दोघींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे काही पुराव्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाही.
चौकशीदरम्यान या दोन्ही महिलांनी त्या बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघींनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. चौकशीत त्यांची नावे रजिया आणि पॉली असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईलसह दोन आधारकार्ड जप्त केली असून ते दोन्ही आधारकार्ड बोगस असल्याचे उघडकीस आले. मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्या दोघीही त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबियांसह नातेवाईक, मित्रमंडळींच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून त्या दोघीही भारतात पळून आल्या होत्या.
गेल्या एक वर्षांपासून त्या दोघीही साकिनाका येथे एका भाड्याच्या रुममध्ये राहत होत्या. त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्या दोघीही तिथे वेश्याव्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, विदेशी व्यक्ती अधिनियम, परकीय नागरिक आदेश कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना बोगस आधारकार्ड कोणी बनवून दिले याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.