पेंटर आर्टिस्टच्या घरातील 77 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश

पळून गेलेल्या तिघांना नागपाड्यातून मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जानेवारी 2026
मुंबई, – सांताक्रुज येथे राहणार्‍या एका पेंटर आर्टिस्टच्या घरी झालेल्या सुमारे 77 लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात सांताक्रुज पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना नागपाडा परिसरातून सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे. मोहन मुखिया, लालू मोहन मुखिया आणि संतोष मुखिया अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गायत्री सुभाष गुजराथी ही पेंटर आर्टिस्ट असून ती सध्या गवालिया टँक, पृथ्वी अपार्टमेंटच्या श्रीकृष्ण इमारतचया फ्लॅट 2/बी मध्ये राहते. तिच्या मालकीच सांताक्रुज येथील जुहू-तारा रोड, व्हिसा सोरेंटो इमारतीमध्ये स्वतचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने गेल्या दिड वर्षांपासून ती गावदेवी येथे भाड्याच्या रुममध्ये राहत आहे. तिथे काम सुरु असल्याने तिने तिचे काही सामान फ्लॅटमध्ये ठेवले होते. या फ्लॅटमध्ये तिने सीसीटिव्ही कॅमेरे लावले असून दर चार ते पाच दिवसांनी ते फ्लॅटचे फुटेज पाहते.

मंगळवारी तिला तिच्या इमारतीचा सुरक्षारक्षक अनिलकुमार शुक्ला यांनी फोन करुन त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे का याबाबत विचारणा केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या मोबाईलवर फ्लॅटच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात तिला 3 जानेवारीला रात्री अडीच ते सव्वातीनच्या सुमारास फ्लॅटच्या खिडकीतून अज्ञात व्यक्तीने प्रवेश केल्याचे दिसून आले. गेस्ट रुमच्या आतील लाकडी कपाटातील लोखंडी लॉकर तुटलेले होते. या लॉकरमधून सोन्या-चांदीचे विविध दागिने, इमिटेशन ज्वेलरी आणि 55 हजाराची कॅश असा 77 लाख 73 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

हा प्रकार उघडकीस येताच तिने सांताक्रुज पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच नागपाडा येथून मोहन मुखिया, लालू मुखिया आणि संतोष मुखिया या तिघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासात तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ते तिघेही मूळचे बिहारचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page