मायलेकींना 34 लाखांना गंडा घालणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जास्त व्याजाच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जानेवारी 2026
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्या एका मायलेकींना एकाच कुटुंबातील तिघांनी सुमारे 34 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जास्त व्याजाचे आमिष दाखवून या मायलेकींना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक करण्यात आली आहे. सागर सुबोध कारीवेडकर, प्रिती सचिन राणे आणि सचिन बाळकृष्ण राणे अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून त्यासाठी त्यांना समन्स बजाविले जाणार आहे. या त्रिकुटाने जास्त परताव्याच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
77 वर्षांची वयोवृद्ध महिला आशा आप्पा जाधव ही अंधेरीतील विरा देसाई रोड, आझादनगरात राहते. तिची मुलगी उत्तरा व तिचा बारा वर्षांचा मुलगा हे दोघेही तिच्यासोबत राहत असून उत्तरा ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 2019 साली तिने एका चॅनेलवर प्रिती राणे हिचा शेअरमार्केटच्या सेमिनारची जाहिरात पाहली होती. त्यात तिने ती महिलांसाठी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत सेमिनार घेत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिची मुलगी उत्तरा हिने तिच्या दादर येथील दोन दिवसांच्या सेमिनारमध्ये भाग घेतला होता. त्यासाठी तिने सात हजार रुपये भरले होते.
तीन वर्षांपूर्वी तिने प्रितीला कॉल करुन शेअरमार्केटमधील ट्रेडिंगबाबत विचारणा केली होती. यावेळी तिने तिला काही शेअरबाबत माहिती दिली होती. तिच्या सांगण्यावरुन तिने शेअरमध्ये गुंतवणुक करताना तिचा भाऊ सागर कारीवडेकर याच्या बँक खात्यात दोन लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. या गुंतवणुकीवर तिला दोन महिन्याने सोळा हजार रुपये मिळत होते. त्यामुळे तिला तिच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे आणखीन चार लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीबाबत तिने तिची आई अनिता जाधव हिला माहिती दिली होती. तिनेही तिच्याकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिने तिच्या विरारच्या फ्लॅटची विक्री करु त्यातून मिळालेली 25 लाख रुपये व तिच्याकडे जमा केलेले पाच लाख रुपये असे तीस लाख प्रितीकडे गुंतवणुकीसाठी ट्रान्स्फर केले होते.
प्रिती आणि तिचा पती सचिनच्या सांगण्यावरुन ही रक्कम तिने सागर कारीवडेकर याच्या बँक खात्यात पाठविले होते. या गुंतवणुकीबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात सचिनने स्वाक्षरी केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना नियमित परतावा मिळत होता. एप्रिल 2025 पर्यंत तिला 11 लाख 60 हजार रुपये मिळाले होते. मे 2025 रोजी राणे पती-पत्नीने उत्तराला मॅसेज करुन त्यांच्या कंपनीचे कामकाज प्रगती पथावर आहे. त्यांच्या कंपनीचे काम लवकर पूर्ण होईल. कंपनीचा सेटअप पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांची मूळ रक्कम आणि परताव्याची रक्कम परत केली जाईल. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे एक-दिड महिन्यांची मुदत मागितली होती.
त्यांच्याकडून त्यांना 34 लाखांच्या मूळ रक्कमेच्या गुंतवणुकीवर 2 लाख 58 हजार 500 रुपये मिळणार होते. मात्र जून-जुलै महिना उलटूनही त्यांनी त्यांना मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांचे बँक खाती गोठविण्यात आले, सागरला हृदयविकाराचा झटका आला आहे, त्याच्यावर उपचार सुरु आहेत असे वेगवेगळे कारण सांगून लवकरच त्यांना पेमेंट दिले जाईल असे सांगितले. मात्र त्यांनी त्यांची रक्कम परत केली नाही.
जास्त व्याजाचे आमिष दाखवून या तिघांनी मायलेकीची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर आशा जाधव हिने आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या कटातील मुख्य आरोपी प्रिती राणे हिच्यासह तिचा पती सचिन राणे आणि भाऊ सागर कारीवडेकर यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.