61 लाखांचे 351 कॅरेटचे हिरे घेऊन हिरे व्यापार्याचे पलायन
अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून व्यापार्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जानेवारी 2026
मुंबई, – क्रेडिटवर विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे 61 लाखांच्या 351 कॅरेटचे हिरे घेऊन एका हिरे व्यापार्याने पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिवांशू सनत बाग या आरोपी व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु आहे. बिवांशूने अटकेच्या भीतीने दोन वर्षांपूर्वी फ्लॅटची विक्री करुन दुसरीकडे स्थालंतर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांना गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
सांताक्रुजचे रहिवाशी असलेले अंकित वल्लभभाई सवानी हे हिरे व्यापारी आहेत. त्यांची सवानी ब्रदर्स नावाची हिरे खरेदी-विक्री करणारी एक कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहेत. मुकेश दंगारिया हा त्यांचा मित्र असून त्याने त्यांची ओळख बिवांशू बागशी करुन दिली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते बिवांशूला ओळख असून त्यांच्यात व्यावसायिक संबंध होते. अनेका बिवांशूने त्यांच्याकडून क्रेडिटवर हिरे घेतले होते, दिलेल्या मुदतीत हिरे किंवा हिर्यांचे पेमेंट केले होते, त्यामुळे त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळे ते त्यांच्यावर निश्चित राहून अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारे काही इच्छुक व्यापारी ओत. त्यांना मोठ्या प्रमाणात हिर्यांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे 351 कॅरेटचे 61 लाख 51 हजार 425 रुपयांचे क्रेडिटवर काही हिर्यांची मागणी केली होती. या हिर्यांच्या विक्रीतून त्यांना चांगला फायदा होईल असे सांगून त्याने त्यांच्याकडून हिरे घेतले होते. दोन दिवसांत हा संपूर्ण व्यवहार होणार होता. मात्र एक आठवडा उलटूनही बिवांशूकडून त्यांना कॉल आला नाही. त्यांनी कॉल केल्यानंतर तो त्यांचा कॉल कट करत होता. तो कामात व्यस्त असल्याने नंतर त्यांनी त्याला कॉल केला नाही.
मात्र तो प्रत्येक वेळेस त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याला त्याच्या राहत्या घरी पाठविले होते. हा कर्मचारी त्याच्या घरी गेला असता त्याला इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडून बिवांश याने दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या फ्लॅटची विक्री केली होती. त्यानंतर तो दुसर्या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता, मात्र तो सध्या कुठे राहतो याची त्याला माहिती नव्हती. या कर्मचार्याकडून ही माहिती मिळताच त्यांना धक्काच बसला होता.
बिवांशूने विक्रीसाठी घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बिवांशू बाग याच्याविरुद्ध हिर्याचां अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. बिबांशूने तक्रारदार अंकित सवानी यांच्यासह इतर काही हिरे व्यापार्याकडून क्रेडिटवर विक्रीसाठी हिरे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.