भांडणाचा बदला घेण्यासाठी मित्राची लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जानेवारी 2026
मुंबई, – जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी एका 43 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच मित्राने हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी परिसरात उघडकीस आली आहे. प्रमोद राम गुप्ता असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याचाच जवळचा मित्र निलेश कालिदास साळुंके (40) याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्षुल्लक वादातून प्रमोदच्या झालेल्या हत्येच्या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना रविवारी रात्री उशिरा वरळीतील वरळी नाका, मंत्री हाऊसखालील इलेक्ट्रीक रिपेरिंग वर्क दुकानाच्या आतील मोकळ्या जागेत घडली. प्रविण रमेश कदम हे हाऊसकिपिंगचे काम करत असून सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत वरळीतील प्रेमनगर परिसरात राहतात. मृत प्रमोद गुप्ता हा त्यांचा मेहुणा आहे. त्याचा निलेश हा मित्र असून ते दोघेही याच परिसरात राहतात. या दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. या भांडणाचा निलेशला प्रचंड राग होता. त्याचा कायमचा काटा काढण्याची योजना बनवून त्याने प्रमोदला इलेक्ट्रीक रिपेरिंग वर्क दुकानाच्या आतील मोकळ्या जागेत बोलाविले होते.
रविवारी रात्री तिथे प्रमोद आला असता त्यांच्यात जुन्या वादातून पुन्हा भांडण झाले होते. यावेळी रागाच्या भरात निलेशने प्रमोदला हातासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत प्रमोद बेशुद्घ झाला होता, त्याची काहीच हालचाल नव्हती. त्यामुळे निलेश हा घाबरला आणि तेथून पळून गेला.स्थानिक रहिवाशांना ही माहिती समजताच त्यांनी मारहाणीत जखमी झालेल्या प्रमोदला तातडीने मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याच्या अहवालात मारहाणीमुळे त्याच्या संपूर्ण शरीरासह छातीवर गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी प्रविण कदम यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस येताच वरळी पोलिसांनी आरोपी मित्र निलेश साळुंके याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या निलेशला वरळी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.