पार्क केलेल्या बाईकची चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपींना अटक करुन चोरीच्या 46 बाईक हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जानेवारी 2026
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस पश्चिम उपनगरात पार्क केलेल्या बाईकची चोरी करुन चोरीच्या बाईकसह पार्टस विक्री करणार्‍या एका सराईत टोळीचा डी. एन नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. मुन्ना केदार माली, अश्पाक इब्राहिम मंसुरी आणि जनार्दन विश्वास बाणे ऊर्फ नाना अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अंधेरी आणि जोगेश्वरीतील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीच्या 46 बाईक हस्तगत केल्या असून त्यांची किंमत सुमारे तेरा लाख रुपये इतकी असल्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी सांगितले. या तिघांच्या अटकेने सहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

5 जुलै ते 27 ऑगस्ट 2025 दरम्यान अंधेरीतील बर्फीवाला रोड परिसरातून राजू बाळकृष्ण पुजारी या तरुणाची बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्याने डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बाईक चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही महिन्यांत पश्चिम उपनगरातील जुहू, डी. एन नगर, वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे या बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांनी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले होते.

या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर, पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रोहन बंगाळे, रेवनाथ घुगे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, सुमीत पोळ, प्रसाद वरे, अनिकेत वाकोडे यांनी बाईक चोरीच्या आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मुन्ना माली आणि जनार्दन बाणे या दोघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.

चौकशीत ते दोघेही बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. दिवसा रेकी करुन ते दोघेही रात्रीच्या वेळेस सोसायटीबाहेरील तसेच रस्त्यावर बर्‍याच दिवसांपासून पार्क केलेल्या बाईकची चोरी करत होते. चोरीच्या बाईक ते दोघेही अश्पाकला विक्री करत होते. अश्पाक हा जोगेश्वरी परिसरात राहत असून तिथेच त्याचे स्वतचे वर्कशॉप आहेत. या वर्कशॉपमध्ये तो चोरीच्या बाईकचे विल्हेवाट लावत होता. या बाईकसह वेगवेगळ्या पार्टस विक्री करत होता.

तपासात ही माहिती उघडकीस येताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस हवालदार रोहन बंगाळे, रेवनाथ घुगे, पोलीस शिपाई ऋषिकेश बाबर, सुमीत पोळ, प्रसाद वरे, अनिकेत वाकोडे यांनी जोगेश्वरीतून अश्पाकला ताब्यात घेतले होते. या तिघांकडून पोलिसांनी चोरीच्या 46 बाईक हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या बाईकची किंमत सुमारे तेरा लाख रुपये आहेत.

तपासात या टोळीने गोरेगाव, कुलाबा, वर्सोवा, डी. एन नगर तसेच इतर पोलीस ठाण्यातून बाईक चोरी केल्याची कबुली दिली असून यातील बहुतांश बाईक चोरी त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केले होते. त्यांच्या अटकेने सहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page